छत्रपती संभाजीनगर : ग्रामीण भागातील रहिवाशांना रोजगाराची कायदेशीर हमी देणारी योजना म्हणजे रोजगार हमी योजना. सध्या या योजनेचे नाव बदलले असले तरी रोजगार हमीच्या मजुरीमध्ये मात्र फारशी वाढ झालेली नाही. २०१४ मध्ये १६८ रुपये असणारा दर आता केवळ ३१७ रुपये आहे. गेल्या १२ वर्षांत मजुरीमध्ये सर्वाधिक वाढ ३२ रुपयांची तर सर्वात कमी वाढ दोन रुपयांची झाली. दुसरीकडे पाणी असणार्‍या केरळात मजुरीचा दर ५०० रुपयांपेक्षा अधिक आहे, तर गोव्यातही तो ४०० रुपयांपेक्षा अधिक आहे.

दुष्काळात रोजगार हमीच्या रोज आढावा बैठका सुरू आहेत आणि ११,८५८ कामांवर ७७,६१० मजुरांची उपस्थिती आहे. म्हणजे सरासरी प्रत्येक कामावर सहा जणांची उपस्थिती. गेल्या वर्षी मजुरीचा दर ३१२ रुपये होता आता तो ३१७ एवढाच.दुष्काळ जाहीर झाला आणि वरिष्ठ अधिकार्‍यांपासून ते लोकप्रतिनिधींपर्यंत ‘व्ही.बी.जी.राम जी’ या नव्या नावासह अधिक काम उपलब्ध करून देण्याचे आश्वासन देत आहेत. ३७५ विविध प्रकारची कामे घेता येऊ शकतील, असे आधिकार्‍यांकडून सांगण्यात येत आहे. मात्र दुष्काळ परिस्थितीमध्ये रोजगाराची मोठी मागणी असतानाही अनेक जिल्ह्यांत कामे सुरू झाली नाहीत.

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात हे प्रमाण एकूण कामांच्या तुलनेत केवळ दोन टक्के एवढेच आहे. दुष्काळाची दाहकता अधिक असणार्‍या परभणीमध्ये ७२५ पैकी केवळ ५८ कामे सुरू असून, यावर फक्त ४७१ मजूर आहेत. ज्या बीड जिल्ह्यातून मजुरीसाठी सर्वाधिक स्थलांतर होते, तिथे केवळ ७,५५६ मजूर उपस्थित आहेत. 

मराठवाड्यात ७ ऑक्टोबरच्या आठवड्यात केवळ ७७ हजार मजुरांची उपस्थिती होती. खरे तर सोयाबीन काढणीचा दर प्रति एकर साडेतीन हजार रुपयांपर्यंत होता. यामुळे महिलांना काही प्रमाणात काम होते. आता हे काम संपेल आणि हाताला काम नसेल अशा चिंतेत गावोगावचे मजूर आहेत.

बीडच्या काठवडा गावातील ऊस तोडणी कामगार संघटनेत काम करणार्‍या ज्योती थोरात म्हणाल्या, ‘आम्ही एवढे कर्ज घेतले आहे, की मजुरी करण्याशिवाय पर्यायच नाही. पण एवढ्या कमी मजुरीत कोण येणार? महिलांना हाताला काम देण्याची आवश्यकता आहे. पण या योजनेत बिहार पॅटर्ननुसार वृक्षलागवड आणि तुती लागवड या दोनच अंगमेहनती शिवायच्या योजना आहेत.’

सकाळी कामावर हजर राहण्यापूर्वी आणि काम संपताना दोन्ही वेळेस मजुराचे छायाचित्र घेण्याच्या अटीमुळे या योजनेत काळेबरे करण्याच्या प्रक्रियांना फाटा बसला आहे. परिणामी या योजनेत काम करण्यास कोणी पुढे येत नाही.

तुटपुंजी वाढ

२०१४ नंतर रोजगार हमीवर संसदेत टीका झाली. तेव्हापासून रोजगार हमीच्या मजुरीत केवळ करोनाच्या काळात मोठी वाढ झाली, ती ३५ रुपयांची. गेल्या सहा वर्षांत कधी दहा रुपये तर कधी १७ रुपये वाढ झाली. तर गेल्या वर्षी योजनेचे नाव बदलताना दर ३१२ रुपयांवरून ३१७ रुपयांवर नेण्यात आला. ग्रामीण भागात शेतीच्या कामातील दर ५०० रुपयांपेक्षा अधिक पोहचला आहे.

दुष्काळाच्या कालावधीमध्ये तरी किमान अधिकचा दर देण्याची तरतूद केली, तर स्थलांतर थांबू शकेल. रोजगार हमीच्या कामावर मजूर न येण्याची अनेक कारणे आहेत. पण कमी मजुरीमुळे या कामांकडे सर्वजण काणाडोळा करतात. – तत्वशील कांबळे, सामाजिक कार्यकर्ते,

बीड दुष्काळी परिस्थितीमुळे ‘व्ही. बी. राम जी’ या योजनेतून कामे उपलब्ध आहेत. जे मजूर मागणी करतील, त्यांना काम देण्याचे नियोजन सुरू आहे. मोठ्या प्रमाणात कामे हाती घेतली आहेत. गेल्या वर्षी ३१२ रुपये दर होता. आता तो ३१७ रुपये आहे. ३७५ प्रकारची कामे योजनेतून घेता येतात. – सर्जेराव सोनवणे, सहआयुक्त, रोजगार हमी