छत्रपती संभाजीनगर – गीत व कविता यातील फरक, वृत्तछंद, मुक्तछंद शब्दांमधील उच्चारांचे वजन आणि लघु-गुरूची भाषा अनुभवतच विद्यार्थ्यांनी शुक्रवारी ज्येष्ठ गीतकार, संगीतकार मिलिंद जोशी यांच्याकडून नवे धडे गिरवले. डाॅ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या मराठी विभागात दोन सत्रांमध्ये आयोजित या कार्यशाळेस ज्येष्ठ अभिनेते दिलीप घारे, विद्यार्थी, संगीत, साहित्य क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते.

डाॅ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, मराठी भाषा व वाङमय विभाग, विभागीय आयुक्त कार्यालय आणि विद्यार्थी विकास मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने २४ ते २७ फेब्रुवारी, असा चार दिवस मायमराठी गौरव महोत्सवाचे आयोजित करण्यात आला होता. मराठी भाषा गौरव दिनानिमित्त प्रा. वा. ल. कुळकर्णी व्याख्यानमालेत शुक्रवारी मिलिंद जोशी यांनी गीतलेखन कार्यशाळा व व्याख्यानामध्ये विद्यार्थ्यांना संगीतचाल लावण्याविषयीची माहिती सांगितली. शब्दाच्या ऱ्हस्वरुपाला लघु तर दीर्घ रुपाला गुरू (ल-गा-गा) म्हणत असल्याचे सांगून विद्यार्थ्यांकडूनच क्रमवार लिखान करून चाल बांधण्याचे सूत्र सांगितले. आपल्याच शब्दाला एक नादमय लय असल्याचे किंवा त्या नादमयी लयीत शब्दरचना होत असल्याचे पाहून विद्यार्थीही हरकून गेले. यावेळी गीत व कवितेतील अंतर वाढल्याकडे लक्षवेधून मिलिंद जोशी यांनी अनेक विद्यार्थ्यांना त्यांच्या कवितेतील नादमय अक्षरे, वृत्तछंद, मुक्तछंद आणि चाली लावण्यायोग्य काव्यलेखनाबाबतची माहिती दिली.

तत्पूर्वी मराठी विभाग प्रमुख प्रा. डाॅ. दासू वैद्य यांनी प्रास्ताविकात चार दिवसांच्या मायमराठी गौरव महोत्सवाच्या आयाेजनामागचा उद्देश सांगून शुक्रवारच्या पूर्वसंध्येला विद्यापीठाच्या नाट्यगृहात आयोजित कविसंमेलनाला अलोट गर्दीने मिळालेल्या प्रतिसादाबद्दलची माहिती दिली. मराठी भाषा व्यवहारात राहिली पाहिजे, अन्यथा तिची अवस्था संस्कृत भाषेसारखी होईल, अशी चिंताही डॉ. वैद्य यांनी व्यक्त केली. मराठी भाषेतील सर्व संत सुरुवातीला कवी होते आणि त्यानंतर त्यांचा प्रवास संतत्वाकडे होत गेल्याचे सांगून कुसुमाग्रजही संतत्वाच्या जातकुळीचे वाटत असल्याचे डॉ वैद्य यांनी सांगितले. मराठी विभागाचे पहिले प्रमुख प्रा. वा. ल. कुळकर्णी हे असे शिक्षक होते त्यांचा प्रभाव विद्यार्थ्यांसह समाजावरही होता, असे सांगून डॉ. वैद्य यांनी वा. ल. यांचा विद्यापीठातील वकूब व आठवणी जागवल्या.

चार दिवस चाललेल्या या मायमराठी गौरव महोत्सवात पहिल्या दिवशी नरहर कुरुंदकर व्याख्यानमालेत परभणी येथील पक्षी अभ्यासक माणिक पुरी यांचे पक्ष्यांबाबतचे समज-गैरसमज, त्यांचे सहजीवन, गुण-वैशिष्ट्ये, सुगरण पक्ष्यानेही त्याचा खोपा आता दोन मजली आणि तीन बेडरूमचा केल्यासह अचंबित करणारी माहिती पुरी यांनी सांगितली.

दुसऱ्या दिवशी भाषा अभ्यासक डॉ. नागेश अंकुश व जालना येथील विनोद जैतमहाल यांची निर्दोष लेखन कार्यशाळा घेण्यात आली. तर तिसऱ्या दिवशी मान्यवर कवींचे संमेलन, नदिष्टकार बोरगावकर यांचा कुलगुरुंच्या हस्ते सत्कार तर मिलिंद जोशी यांच्या गीतलेखनाच्या माहितीपूर्ण सांगीतिक भाग असलेल्या कार्यशाळेने चौथ्या दिवसाचा समारोप झाला.