औरंगाबाद : औरंगाबादेत सध्या दुधाची टंचाई जाणवत असून देवगिरी महानंदा दूध संघाच्या माहितीनुसार त्यांच्याकडे सध्या ३५ ते ४० हजार लिटर प्रतिदिन दुधाची तूट आहे. तर औरंगाबादेत केवळ ३० टक्केच निकं दूध उपलब्ध होत असून उर्वरित जवळपास ७० टक्के भेसळयुक्त येत असल्याची शंका काही दुग्धव्यवसायातील शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.

देवगिरी महानंद दूध संघाकडे पूर्वी १ लाख ते १ लाख १० हजार लिटर प्रतिदिन दुधाचे संकलन होत होते. आता ते प्रतिदिन ६५ हजार लिटपर्यंत खाली आले आहे. साधारण ३५ ते ४० हजार लिटपर्यंतची तूट निर्माण झाली आहे.

दुग्धोत्पादनात उतरलेल्या खासगी दूध संकलित संस्थांकडून मागणी वाढलेली असून दुधातून मिळणाऱ्या नफ्याचे गणित जुळत नसल्याने अनेकांनी या व्यवसायाकडे पाठ फिरवलेलीही दिसत आहे. पावसाळ्यात पशुधनाकडून निघणाऱ्या दुधात होणारी घट, पशुखाद्याचे वाढलेले दर आणि त्या तुलनेत मिळणारा तुटपुंजा दर, अशी अनेक कारणे दूधटंचाईसाठी सांगितली जात आहेत. म्हैस, गाय या पशुधनाचे वाढलेले दरही आणखी एक कारण सांगितले जात आहे.

दुग्ध व्यवसायातील शिंदे पाटील यांनी सांगितले,की दुधाची ढेप पूर्वी २ हजार रुपयांना मिळायची. आता ढेपेची किंमत साडे तीन हजार रुपये क्विंटल झाली आहे.

६० ते ७० हजार रुपयांना मिळणाऱ्या म्हशीची किंमत एक लाखांच्या पुढे गेली आहे. २५ ते २६ रुपये गायीच्या दुधाला लिटरमागे काही संस्था दर देत असल्या तरी तो परवडत नाही. औरंगाबादेत मिळणारे बहुतांश दूध अधिक घट्ट दिसत असल्याचे जाणवत असले तरी त्यात भेसळीचेच प्रमाण आहे. सुमारे ६५ ते ७० टक्के दूध भेसळयुक्त असण्याची शक्यता आहे.

सध्या दुधामध्ये ३५ हजार लिटपर्यंत तूट जाणवत आहे. पूर्वी संघाकडे १ लाखांवर लिटर प्रतिदिन दूध संकलित व्हायचे. आता ६५ हजार लिटपर्यंत आले आहे. खासगी संस्थांकडून जादा दर दिला जात असून त्यातून त्यांच्याकडे दुग्ध व्यवसाय करणारे वळत असावेत. पावसाळ्यात पशुधनाकडून निघणाऱ्या दुधातही काही प्रमाणात घट होत असते.  – पी. बी. पाटील, व्यवस्थापकीय संचालक, देवगिरी महानंदा दूध संघ.

अहमदनगर जिल्ह्य़ातील नेवासा फाटा, शेवगावमधून औरंगाबादेत बरेच दूध येते. शहराच्या आजूबाजूच्या ५० ते १०० किलोमीटरच्या परिसरात शेतकरी दूध पुरवठा करत आहेत. पेंडीचा भाव २० टक्क्य़ांनी वाढला आहे. त्या दराच्या तुलनेत संघाला दूध देणे परवडत नाही. साडे आठ रुपये फॅटने खासगी डेअरीवाले दूध खरेदी करतात. काही शेतकऱ्यांनी दुग्धव्यवसाय बंद केल्यामुळेही काहींना दूध मिळण्यासाठी अडचणी येत असू शकतात.

–  राहुल सावजी, खासगी दूध व्यावसायिक.