छत्रपती संभाजीनगर : महापालिका निवडणुकांच्या प्रचारा दरम्यान एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांच्या गाडीवर हल्ला करण्यात आला आहे. ही घटना शहरातील बायजीपुरा, जिन्सी भागात घडली. या हल्ल्यात एमआयएमचा एक कार्यकर्ता जखमी झाला आहे. सुरुवातीला काही जणांनी जलील यांना काळे झेंडे दाखवले. जमाव आक्रमक होत असल्याने पोलिसांनी लाठी हल्ला केल्याचेही वृत्त आहे.
सलीमनगर, संजयनगर भागाजवळील पाण्याच्या टाकीजवळच्या या घटनेनंतर प्रचंड मोठ्या संख्येने इम्तियाज जलील यांचेही समर्थक एकत्र आले असून, त्यांच्या एका नेत्याने हा हल्ला कलीम कुरेशी यांच्याकडून घडवून आणण्यात आल्याचा आरोप केला आहे. तर इम्तियाज जलील यांच्या विरोधी गटाकडून जलील हे सहानुभूती मिळवण्यासाठी प्रयत्न करत असल्याचा त्यांनीच हल्ल्याचा बनाव रचल्याचा आरोप केला आहे. तसेच तिकीट वाटपातील आर्थिक व्यवहारातून हल्ला झाल्याचाही आरोप करत आहेत.
कॉग्रेसचे उमेदवार कलीम कुरेशी यांनी हे घडवून आणल्याचा आरोप एमआयएमच्या वतीने करण्यात आला आहे. एमआयएमने संभाजीनगरमध्ये २१ नगरसेवकांची उमेदवारी कापून नव्यांना संधी दिली. त्यामुळे पक्षातही असंतोष होता. काही दिवसापूर्वी इम्तियाज जलील यांचे छायाचित्रही फाडून निषेध व्यक्त करण्यात आला होता.
हल्ला झाला तेव्हा इम्तियाज जलील हे वाहनातील पुढच्या सिटवर बसले होते. सुरुवातीला काळे झेंडे दाखवल्यानंतर पोलिसांनी लाठीचार्ज केला होता. इम्तियाज जलील यांच्या गाडीत मागच्या सीटवर बसलेल्या व्यक्तीच्या डोळ्याला दुखापत झाली असल्याचे सांगण्यात आले. यासंदर्भात इम्तियाज जलील यांनी माध्यमांसमोर बोलताना सांगितले की, शंभर गुंड प्रवृत्तीचे काही लोक चालून आले. हे गुंड शहरातील दोन मंत्र्यांनी पाळलेले असून, त्यांनीच विधानसभा व लोकसभा निवडणुकीच्या कालावधीत गुंडांना मदत केल्याचा आरोप इम्तियाज जलील यांनी केला आहे. तसेच पोलीस यासंदर्भात पुढील कारवाई करतील, परंतु पुढे त्यांनी केले नाही तर आमचे आम्ही बघून घेऊ, असा इशाराही दिला आहे.
