औरंगाबाद: एमआयएमचे नेते अकबरोद्दीन ओवेसी, खासदार इम्तियाज जलील, वारीस पठाण यांनी कार्यकर्त्यांसह खुलताबाद येथील औरंगजेबच्या कबरीचे दर्शन घेतले. त्यामुळे नव्या वादाला तोंड फुटले असून शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी ही कृती समाजात तेढ निर्माण करणारी असल्याची टीका  केली आहे. औरंगाबाद शहरात एमआयएमच्या वतीने एक शाळा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला असून ही शाळा ताजमहालची सुंदरशी तुलना करणारी असेल,अशी घोषणा अकबरोद्दीन ओवेसी यांनी भाषणादरम्यान केली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आक्रमक भाषणासाठी ओळखले जाणारे अकबरोद्दीन यांनी गुरुवारी केलेल्या भाषणात मुस्लिमांच्या शिक्षणातील घसरणीबाबत चिंता व्यक्त केली. तसेच हैदराबादमध्ये ज्या पद्धतीने शिक्षण, आरोग्य क्षेत्रात काम केले आहे तसेच ते औरंगाबादमध्येही सुरू केले जाईल असे सांगितले. देशाच्या बांधणीमध्ये केवळ एक आणि एकच धर्म  किंवा जात पुढे जाणार असेल तर देश पुढे जाईल असे मानणारा माणूस मूर्ख असेल. देशात हिंदु, मुस्लीम, शीख, इसाई, पारशी, जैन सारेजण पुढे गेले तर देश पुढे जाईल. औरंगाबाद येथील शाळेत सर्व धर्मीयांना प्रवेश असेल, असेही अकबरोद्दीन ओवेसी म्हणाले.  खुलताबाद येथील औरंगजेबाच्या कबरीसमोर नतमस्तक होणाऱ्या एमआयएमच्या नेत्यांवर टीका होऊ लागल्यानंतर खासदार जलील यांनी स्पष्टीकरण दिले. जलील म्हणाले, खरे तर खुलताबादमध्ये अनेक दर्गा आहेत. त्यामुळे एकाचे दर्शन घेतले, दुसऱ्याकडे दुर्लक्ष केले असे करता येत नसते. त्यामुळे याचे वेगळे अर्थ काढण्यात येऊ नयेत असे ते म्हणाले. कबरीसमोर नतमस्तक होताना जलील यांनी भगवा रुमाल परिधान केला होता. या विषयी बोलताना ते म्हणाले,’ भगवा, हिरवा, निळा सारे रंग माझे आहेत.’ औरंजेबाच्या कबरीसमोर आम्ही कधी नतमस्तक झालो होतो, असा सवाल करणारे खासदार जलील यांची जुनी चलचित्रेही समाजमाध्यमातून आवर्जून फिरत होती. या अनुषंगाने बोलताना माजी खासदार शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी, शाळा बांधताय याबद्दल अभिनंदन, पण औरंगजेबाच्या कबरीसमोर नस्तमस्तक होणे ही कृती तेढ निर्माण करणारी असल्याचे म्हटले आहे. 

काय उत्तर देणार ? 

ज्यांना घरातून बाहेर काढले आहे आणि ज्यांची लायकी नाही त्यांना काय उत्तर देणार, असा प्रश्न उपस्थित करीत ओवेसी यांनी भोंग्याबाबत सुरू असणाऱ्या वादाकडे दुर्लक्ष करण्याचे आवाहन कार्यकर्त्यांना केले. ज्यांचा एकही खासदार नाही, ते भुंकतायत, त्यांना भुंकू द्या, त्यांच्याकडे लक्ष देऊ नका. तो टीआरपीचा खेळ आहे, असेही ते म्हणाले.

Aurangabad News (छत्रपती संभाजीनगर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mim leader bows aurangzeb grave new controversy aurangabad politics shiv sena criticism ysh
First published on: 13-05-2022 at 00:02 IST