नांदेड : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्थापक डॉ.केशव बळीराम हेडगेवार यांच्या पूर्वजांच्या कंदकुर्ती (जि.निजामाबाद) या गावातील केशव स्फूर्ती मंदिराचे नुतनीकरण लोकवर्गणीतून करण्यात आले असून त्याचे उद्घाटन येत्या ११ एप्रिल रोजी सरसंघचालक डॉ.मोहन भागवत यांच्या हस्ते होणार आहे.

कंदकुर्ती हे गाव महाराष्ट्र-तेलंगणाच्या सीमेवर बोधन तालुक्यात असले, तरी नांदेड जिल्ह्याच्या धर्माबाद या गावचा वरील गावाशी जवळचा संबंध असून केशव स्फूर्ती केंद्र या स्वयंसेवी संस्थेत वरील गावातील सुबोध काकाणी व रवींद्र पोतगंटीवार यांचा समावेश आहे. श्री चामकोरा सुधाकर रेड्डी हे या संस्थेचे अध्यक्ष आहेत. समाजातील वेगवेगळ्या घटकांतील लोकांनी दिलेल्या देणग्यांतून केशव स्फूर्ती मंदिराच्या नुतनीकरणाचे काम करण्यात आल्याची व ते अंतिम टप्प्यात असल्याची माहिती पोतगंटीवार यांनी दिली. वरील कामासाठी सरकारकडून निधी घेण्यात आला नाही, असे त्यांनी नमूद केले.

कंदकुर्ती हे छोट्या गावात हेडगेवार यांच्या पूर्वजांचे वास्तव्य होते. हीच या गावाची ठळक ओळख होय. सुमारे अडीच वर्षांपूर्वी डॉ.हेडगेवार यांचा अर्धाकृती पुतळा वरील गावातच एका झाडीझुडपात उघड्यावर पडल्याची बाब बिलोलीचे माजी आमदार दिवंगत गंगाधर पटने यांनी कॅमेर्‍यात टिपली होती. त्यांनी दिलेल्या माहितीच्या आधारे प्रसिद्ध झालेल्या वृत्तामुळे संघपरिवारात एकच खळबळ उडाली होती; पण त्याचवेळी वरील गावातील केशव स्फूर्ती मंदिराचे नव्याने बांधकाम होणार असल्याची व त्यासाठी जुने बांधकाम जमीनदोस्त करण्यात आल्याची माहिती नंतर समोर आली. नंतरच्या काळात या मंदिराचे बांधकाम सुरू झाले. तब्बल दोन वर्षांनंतर ते आता पूर्ण झाले आहे.

जुन्या मंदिरामध्ये भारत माता व केशवराज यांची मूर्ती तसेच डॉ.हेडगेवार यांचा एक पूर्णाकृती पुतळा होता. मागील अनेक वर्षांपासून संघ आणि भाजपाशी संबंधित कार्यकर्ते, हितचिंतक कंदकुर्तीत जाऊन वरील मंदिराला भेट देत असत. हेडगेवार यांचा पुतळा उघड्यावर पडल्याची बाब निदर्शनास आल्यानंतर धर्माबाद भागाचे प्रतिनिधित्व करणारे भाजपा आमदार राजेश पवार यांनी आवश्यक ती जबाबदारी घेण्याची तयारी तेव्हा दर्शविली होती; पण राजकीय पक्ष किंवा सरकारांची मदत न घेता वरील मंदिराचे काम पूर्ण करण्यात आले.

मंदिराच्या परिसरातच स्टेट बँक ऑफ इंडियाच्या सीएसआर फंडातून प्राप्त झालेल्या आर्थिक साहाय्यातून युवकांसाठी कौशल्य विकास केंंद्र तसेच सेवाभारतीतर्फे चालविण्यात येणार्‍या शाळेच्या इमारतीचे बांधकाम केले जाणार आहे. वरील कार्यक्रमाची पत्रिका जारी करण्यात आली आहे. या कार्यक्रमापासून तेलंगणा तसेच नांदेड जिल्ह्यातील भाजपाशी संबंधित सर्वच नेत्यांना दूर ठेवण्यात आले असल्याचे दिसून आले. भाजपाचे राज्यसभा सदस्य डॉ.अजित गोपछडे यांनी अलीकडे कंदकुर्ती हे गाव धर्माबाद रेल्वे स्थानकापासून जवळ असल्याच्या पार्श्वभूमीवर या स्थानकाला डॉ.हेडगेवार यांचे नाव देण्याची मागणी केली होती; पण त्याबाबत अद्याप कुठलीही हालचाल नसल्याचे द.म.रेल्वेच्या स्थानिक विभागीय कार्यालयाकडून सांगण्यात आले.

हेडगेवार यांची जयंती नुकतीच पार पडली. त्यानंतर लगेचच त्यांच्या मूळ गावी सरसंघचालक डॉ.भागवत येणार असल्याच्या पार्श्वभूमीवर कंदकुर्ती येथे कार्यक्रमाची जोरदार तयारी सुरू आहे.