छत्रपती संभाजीनगर: छत्रपती संभाजी महाराजांच्या नावापुढे ‘धर्मवीर’ ही उपाधी लावली जाते. अलिकडच्या काळातील काही नेत्यांच्या नावापुढेही ‘धर्मवीर’ हे बिरूद लावले जात आहे. अखंडित शिवसेनेतील ठाणे येथील दिवंगत नेते आनंद दिघे यांच्या नावापुढेही ‘धर्मवीर’ हे नाव आवर्जून लावले जात असून, दिघे यांच्या जीवनावर बेतलेल्या चित्रपटाचे नावही ‘धर्मवीर’च आहे, हे सर्वश्रुत आहे. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना पक्षाच्या कार्यक्रमांमध्ये दिघे यांचा ‘धर्मवीर’ म्हणून जाहीरपणे जयघोष होतो. आता मराठवाड्यातूनही ‘धर्मवीर’ म्हणून एक नाव पुढे आले आहे.
छत्रपती संभाजीनगरमध्ये ‘धर्मवीर’ ही उपाधी माजी खासदार मोरेश्वर सावे यांच्या नावापुढे लागणार असून, त्यांचे नाव एका रस्त्याला देण्याचा ठराव मंगळवारी छत्रपती संभाजीनगर महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत मंजूर करण्यात आला आहे.
मोरेश्वर सावे हे शिवसेनेचे मराठवाड्यातील पहिले खासदार. राज्यातील विद्यमान इतर मागास बहुजन कल्याणमंत्री अतुल सावे यांचे ते वडील. अतुल सावे आता भाजपमधील दिग्गज आेबीसी नेत्यांमधील मराठवाड्यातील प्रमुख चेहरा. मंत्री सावे यांचे संपर्क कार्यालय असलेल्या सिडकोतील चिश्तीया चौक ते बळीराम पाटील मार्गावरील बजरंग चौकात आहे. याच मार्गाला आता ‘धर्मवीर मोरेश्वर सावे’ हे नाव देण्यात आले आहे.
तसे पाहता सावे कुटुंब हे मूळचे लातूर शहराजवळील सावेवाडीचे. व्यवसायानिमित्त ते तत्कालीन औरंगाबाद शहरामध्ये स्थायिक झाले. मोरेश्वर सावे यांनी त्यांच्या राजकारणाची सुरुवात महानगरपालिकेच्या निवडणुकीपासून केली. महापालिका निवडणुकीत अपक्ष म्हणून विजयी झाले तेव्हा त्यांचे चिन्ह ‘मशाल’ होते. महापौरपदाच्या निवडणुकीत शिवसेनेने त्यांना पाठिंबा दिला. सावे औरंगाबादच्या महापौरपदावर विराजमान झाले. त्यानंतर सावे यांनी अधिकृतपणे शिवसेनेत प्रवेश केला.
१९८९ मध्ये लोकसभा निवडणूक लढवली आणि शिवसेनेकडून निवडूनही आले. सावे शिवसेनेचे मराठवाड्यातील पहिले खासदार ठरले. हिंदुत्वाच्या मुद्यावर बाळासाहेब ठाकरे यांच्या झंझावाताने मराठवाडा व्यापू लागला होता. मोरेश्वर सावे हे मराठवाड्यातील शिवसैनिकांमधील महत्त्वाचे नाव झाले होते. अयोध्येतील राम मंदिर उभारणीचा प्रश्न देशभर चर्चेत आला त्याला शिवसेनेही पाठिंबा दिला. बाबरी मशिदीचा ढाचा पाडल्यानंतर उसळलेल्या दंगलीनंतरच्या प्रकरणात ज्यांची नावे पहिल्या दहा आरोपींमध्ये नोंद झाली त्यात सावे यांचेही नाव होते.
या प्रकरणाचा खटलाही अनेक वर्षे चालला होता. पुढे त्यांनी शिवसेनेतील अंतर्गत राजकारणाला कंटाळून पक्षाला सोडचिठ्ठी दिली. त्यांचे चिरंजीव अतुल सावे यांना देवेंद्र फडणवीस पहिल्यांदा मुख्यमंत्री झाले तेव्हा त्यांच्या मंत्रिमंडळात उद्योग विभागासारख्या खात्याचे राज्यमंत्रीपद मिळाले. विद्यमान फडणवीस सरकारमध्ये अतुल सावे कॅबिनेटमंत्री असून त्यांच्याकडे राज्याचे अपारंपरिक ऊर्जा विभागाच्या मंत्रीपदाचीही जबाबदारी आहे.
