महिला आयोग अध्यक्षांना मुस्लीम महिलांचे साकडे

मुस्लीम समाजात तीन वेळा ‘तलाक’ हा शब्द उच्चारून दिल्या जाणाऱ्या घटस्फोटाच्या प्रक्रियेवर बंदी घालावी, अशी मागणी मुस्लीम महिला आंदोलन या संघटनेमार्फत अकराशे महिलांनी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांच्याकडे केली आहे. धर्मसंमत आणि न्यायसंगत ही मागणी योग्य असल्याचे या संघटनेच्या नूरजहाँ शेख यांनी सांगितले. थेट अकराशे मुस्लीम महिलांचे निवेदन आल्यामुळे या निवेदनाची प्रत महिला आयोगाच्या अध्यक्षा रहाटकर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यालयास पाठविली आहे.

मुस्लीम समाजात रमजान हा पवित्र महिना मानला जात असल्याने महिलांच्या अंगाने धर्मसुधारणा केल्या जाव्यात, या साठी मुस्लीम महिला आंदोलन या संघटनेच्या वतीने जनजागृती अभियान हाती घेण्यात आले आहे.

मुंबईसह इतर १३ राज्यांत या संघटनेच्या १ लाख महिला सदस्य असल्याचा दावा संघटनेने केला आहे. नवऱ्याच्या मनात येईल तेव्हा केवळ ३ वेळा तलाक शब्द उच्चारून दिला जाणारा घटस्फोट अन्यायकारक असल्याचे या संघटनेच्या नूरजहाँ शेख यांनी म्हटले आहे. अकराशे महिलांच्या मोबाइल क्रमांकांसह देण्यात आलेल्या या निवेदनाची संवेदनशीलपणे दखल घेण्यात आली असून मुस्लीम पर्सनल लॉ व घटनेतील अधिकार सर्व महिलांना मिळावेत, या साठी प्रयत्न केले जावेत, असे रहाटकर यांनी म्हटले आहे.