छत्रपती संभाजीनगर : आपल्या ग्रामीण ढंगाच्या बोलीने लक्षवेधक बोलणारे खासदार संदीपान भुमरे यांनी शिवसेनेचे गटनेते डॉ. श्रीकांत शिंदे यांच्यामार्फत गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली. छत्रपती संभाजीनगरसाठी ‘ इमिग्रेशन चेकपोस्ट’ ची निकड कशी अधिक आहे, हे सांगणारे निवेदन त्यांनी दिले. तर दुसरीकडे केंद्रीय रेल्वेमंत्री अश्वीन वैष्णव यांची भेट घेऊन मराठवाड्यासाठी स्वतंत्र रेल्वे मंडळाची मागणी पुन्हा एकदा केली. या दोन्ही गाठीभेटीनंतर खासदार दिल्लीत सक्रिय झाल्याची प्रतिक्रिया छत्रपती संभाजीनगरच्या राजकीय गोटात उमटू लागली झाली.

भुमरे यांनी आतार्यंत त्यांचा ग्रामीण बाज कायम जपला होता. आता खासदार झाल्यानंतर शहरी प्रश्नांवर आपण लक्ष केंद्रीत करत असल्याचा संदेश त्यांच्याकडून देण्यात आला आहे. गृहमंत्री अमित शहा यांना देण्यात आलेल्या निवेदनात औद्योगिक, पर्यटन आणि आर्थिक विकासाला चालना देण्यासाठी छत्रपती संभाजीनगर विमानतळावर तातडीने ‘इमिग्रेशन चेकपोस्ट’ गरज असल्याने त्यास मान्यता द्यावी अशी मागणी त्यांनी केली आहे. छत्रपती संभाजीनग हे आंतरराष्ट्रीय पर्यटन केंद्र असून, अजंठा-वेरूळ लेणी, देवगिरी किल्ला, बीबी का मकबरा यांसारख्या ऐतिहासिक आणि जागतिक पर्यटनस्थळांमुळे देश-विदेशातून मोठ्या संख्येने पर्यटक येथे येतात.

मात्र, थेट आंतरराष्ट्रीय विमानसेवा उपलब्ध नसल्याने विदेशी पर्यटक, उद्योजक, गुंतवणूकदार आणि व्यावसायिकांना मुंबई अथवा दिल्लीमार्गे प्रवास करावा लागतो. छत्रपती संभाजीनगर विमानतळावर आंतरराष्ट्रीय विमानसेवेसाठी आवश्यक पायाभूत सुविधा उपलब्ध असून ब्युरो ऑफ इमिग्रेशनकडून विमानतळाची पाहणी पूर्ण झाल्याचे खासदार भूमरे यांनी केंद्रीय गृहमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिले. आंतरराष्ट्रीय विमानसेवा सुरू करण्यास इच्छुक असलेल्या विमान कंपन्यांसाठी आवश्यक असलेल्या प्रक्रियेत केंद्रीय गृह मंत्रालयाकडून इमिग्रेशन चेकपोस्टची अधिकृत मंजुरी महत्त्वाची असून, ही मंजुरी प्रलंबित असल्याने आंतरराष्ट्रीय विमानसेवा सुरू करण्यास अडथळा निर्माण होत असल्याचे भुमरे यांनी म्हटले आहे.

मराठवाड्यासाठी स्वतंत्र रेल्वे मंडळाची मागणी

मराठवाड्याच्या रेल्वे विकासाला गती देण्यासाठी मराठवाड्यासाठी स्वतंत्र रेल्वे मंडळ स्थापन करण्यात यावे, या मागणीसाठी खासदार संदिपान भुमरे यांनी रेल भवन दिल्ली येथे केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांना पुन्हा स्मरणपत्र दिले. या पूर्वी खासदार भुमरे यांनी ८ जुलै २०२६ रोजी रेल्वेमंत्र्यांकडे स्वतंत्र रेल्वे मंडळाच्या मागणीसंदर्भात पत्र दिले होते. सध्या मराठवाडा दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड मंडळाच्या कार्यक्षेत्रात येतो. मराठवाड्याची भौगोलिक व्याप्ती, वाढती लोकसंख्या, औद्योगिक विकास, पर्यटनाच्या वाढत्या संधी आणि रेल्वे प्रवाशांच्या वाढत्या गरजा लक्षात घेता स्वतंत्र रेल्वे मंडळ स्थापन करणे आवश्यक असल्याचे भुमरे यांनी म्हटले आहे.

स्वतंत्र रेल्वे मंडळामुळे स्थानिक पातळीवर निर्णय प्रक्रिया अधिक गतिमान होण्याबरोबरच नवीन रेल्वे प्रकल्प, रेल्वे मार्गांचे दुहेरीकरण व विद्युतीकरण, स्थानकांचा विकास, प्रवासी सुविधा आणि देखभाल-दुरुस्तीच्या कामांना वेग मिळणार आहे. तसेच छत्रपती संभाजीनगर, अजिंठा, वेरूळ, दौलताबाद, पैठण, औंढा नागनाथ, परळी वैजनाथ यांसारख्या ऐतिहासिक व धार्मिक पर्यटनस्थळांना रेल्वे दळणवळणाचा लाभ होईल असे त्यांनी पत्रात म्हटले आहे.

शेंद्रा-बिडकीन औद्योगिक क्षेत्राच्या विकासालाही मिळणार बळ

दिल्ली-मुंबई औद्योगिक कॉरिडॉरअंतर्गत शेंद्रा-बिडकीन औद्योगिक क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक होत आहे. या पार्श्वभूमीवर मालवाहतूक, रेल्वे साइडिंग, माल टर्मिनल, पिट लाईन आणि लॉजिस्टिक सुविधांचा विकास करण्यासाठी स्वतंत्र रेल्वे प्रशासकीय व्यवस्था उपयुक्त ठरेल, असे खासदार भुमरे यांनी स्मरणपत्रात नमूद केले आहे. मराठवाड्यासाठी स्वतंत्र रेल्वे मंडळ स्थापन करण्यासाठी सविस्तर व्यवहार्यता अहवाल तयार करून केंद्र सरकारच्या मंजुरीसाठी प्रस्ताव तातडीने सादर करण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना द्यावेत, अशी मागणी खासदार संदिपान भुमरे यांनी रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे केली आहे.