छत्रपती संभाजीनगर : मध्यप्रदेश, बिहार, राजस्थानमध्ये तेथील राज्य आयोगामार्फत होणाऱ्या परीक्षा ‘ ऑनलाईन ’ होतात हे सरकारचे म्हणणे खोटे आहे. तेथेही ‘ऑफलाईन’च परीक्षा होत आहेत. अशा परीक्षा घेण्यासाठी पुरेशा संगणकही राज्य सरकारकडे नाहीत. मग महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षा ऑनलाईन कशासाठी ? विविध परीक्षेचा निकाल लावताना ‘ नॉर्मललाझेशन ’ नावाचा गाेंडस शब्द वापरुन भ्रष्ट मार्गाने अधिकाऱ्यांची भरती केली जात आहे. त्याविरुद्ध आवाज उठविणाऱ्या विद्यार्थ्यांची कायम साथ देऊ असे आश्वासन आमदार रोहित पवार यांनी दिले. सोमवारी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षा ‘ ऑफ लाईन ’ घ्याव्या तसेच शिक्षक पात्रता परीक्षेतील घोटाळ्यातील दोषींवर कारवाई करत विद्यार्थ्यांनी मंत्री दादा भुसे यांच्या राजीनाम्याची मागणी जोरकसपणे केली. या मागण्यांना पाठिंबा देण्यासाठी कॉक्रोच जनता पार्टीचे प्रमुख अभिजीत दिपके यांची उपस्थिती होती.

या वेळी बोलताना आमदार रोहित पवार म्हणाले, अन्य राज्यात आयोगामार्फंत होणाऱ्या भरती परीक्षा ऑनलाईन होतात, असे राज्य सरकारचे म्हणणे आहे. प्रत्यक्षात असे होत नाही. मात्र, सरकार खोटे बोलत आहे. राजकीय पातळीवर फोडाफोडी करुन सत्तेवर असलेल्या सरकारला विद्यार्थ्यांचे प्रश्न समजून घ्यायचे नाहीत. आम्ही मात्र यात सकारात्मक आहोत. शासकीय पातळीर राजकीय नेते जसे हा शब्द वापरतात तसा याचा अर्थ नाही, असे म्हणत गेल्या काही दिवसात झालेल्या पेपरफुटीचे उदाहरणे समोर ठेवली. तलाठी भरतीचा पेपर फुटला यात अभ्यास न करणारा मुलगा ‘ नॉर्मलायझेशन ’ च्या निकषामुळे पुढे जात आहे. खरे तर अशा व्यवस्थेमुळे होणाऱ्या भरतीमध्ये भ्रष्टाचार करण्यास वाव निर्माण होतो असा आरोप आमदार राेहित पवार यांनी केला.

आयोगाकडून होणाऱ्या परीक्षांसाठी पुरेशा प्रमाणात संगणक नाहीत. एकाच पदासाठी अनेक वेळा परीक्षा होत असल्याने निकष ठरविणे अवघड होऊन गेले आहे. जर दहावी, बारावी, युपीएससीच्या परीक्षा नीट होतात तर मग महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षा ऑनलाईन का, असा प्रश्न त्यांनी विचारला. या प्रश्नावर सरकारपर्यंत आवाज पोहचावा म्हणून पुणे येथे पुन्हा आंदोलन करण्याचा निर्णयही घेण्यात आला. या आंदोलनात काही विद्यार्थ्यांनीही आपली मनोगते व्यक्त केली. लाकुडतोड्याच्या गोष्टीतील ‘सोन्याची कुऱ्हाड आम्हाला नको, आम्हाला आमची लोखंडी कुऱ्हाडच द्या ’ या शब्दात ‘ ऑफलाईन ’ परीक्षेची मागणी करण्यात आली. या आंदोलनात रविराज साबळे, आशिष मगर, रविकांत तुपकर, बाबासाहेब शिंदे, शिवराज मोरे, प्रमोद पाटील, किरण निंभोरे यांचा सहभाग होता.

‘ आम्ही व्हायरस नाही, व्हॅक्सीन ’

केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी जंतरमंतरवर आंदोलन करणााऱ्यांना आंतकवादी म्हटले. पण देशातील तरुणाई ही ‘ व्हायरस ’ नाही ‘ व्हॅक्सीन ’ आहे. उलट तुमच्यामुळे देशातील नीटची तयारी करणाऱ्या २० जणांनी आत्महत्या केल्या. पेपरफुटीमुळे अनेकांचे आयुष्य पणाला लागले. या स्थितीला तुम्हीच जबाबदार असल्याने तुम्हीच आंतकवादी आहात, असे कॉक्रोच जनता पार्टीचे अभिजीत दिपके या वेळी म्हणाले. दिल्लीतील जंतरमंतरवर सुरू असणाऱ्या आंदोलनात सोनम वांगचूक हे गेल्या १६ दिवसापासून उपाेषण करत आहेत. दिल्लीतील आंदोलन धमेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेतल्याशिवाय थांबणार नाही. या आंदोलनात मराठवाड्यातील तरुणांनी सहभाग द्यावा, असे आवाहन दिपके यांनी केले.