छत्रपती संभाजीनगर : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेतील पेपरफुटीच्या अनुषंगाने रोहित पवार प्रमुख शहरात आंदोलन करत असताना आता विद्यार्थ्यांनी आंदोलनाला अधिक टोकदार करण्याचा निर्णय घेतला आहे. नुकतेच अभिजीत दिपके यांनी या कामी पुढाकार घ्यावा अशी विनंती स्पर्धा परीक्षकांनी केली आहे. लवकरच या अनुषंगाने आंदोलन सुरू होईल असे सांगण्यात येत आहे. पेपरफुटीच्या अनुषंगाने नेमण्यात आलेल्या व्ही. राधा यांच्या अध्यक्षतेखाली नेमण्यात आलेल्या विशेष तपास पथकासमोरही काय मांडायचे याचीही चाचपणी केली जात आहे.
एमपीएससीचे अध्यक्ष आणि सचिव यांच्या राजीनामा इतर मागण्या पूर्ण व्हाव्यात म्हणून पुन्हा एक नवे आंदोलन उभे राहणार आहे. सप्टेंबरच्या तिसऱ्या आठवाड्यात पेपरफुटीचा तपास करणारे पथक छत्रपती संभाजीनगरला येण्याची शक्यता आहे. तत्पूर्वी नव्या आंदोलनाची तयारी सुरू झाली आहे. गणेश विसर्जनापर्यंत राज्य सरकारने अध्यक्ष आणि सचिवाचा राजीनामा घ्यावा अन्यथा हे आंदोलन अधिक व्यापक आणि मोठे करू असे सांगण्यात येत आहे. या आंदोलनाची दिशा ठरविण्यासाठी शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी अभिजीत दिपके यांची भेट घेतली. या सर्व आंदोलनकर्त्यांच्या मागे आम्ही उभे राहू, असे दिपके यांनीही जाहीर केले आहे.
गट क मधील परीक्षा पुढे ढकलल्याने हा पेपरही फुटला आहे, असा आरोप आता विद्यार्थी करत आहेत. या अनुषंगाने राेहित पवार यांनी नुकतेच छत्रपती संभाजीनगर आणि लातूरमध्ये आंदोलन केले. आता विद्यार्थी एमपीएससीचे अध्यक्ष विवेक भिमनवार यांच्या राजीनाम्यासाठी आक्रमक झाले आहे.
संभाजी ब्रिगेडने एमपीएससीचे सचिव महिंद्र हरपाळकर यांना नुकतेच काळे फासले आहे. या पुढे अध्यक्ष आणि सचिवाच्या राजीनामा ही मागणी उचलून धरण्यात येणार आहे, असे स्पर्धक विद्यार्थी सांगत आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विवेक भिमनवार यांचे सारे भ्रष्टाचाराची प्रकरणे माहीत असताना त्यांनी नियुक्ती करण्यास मान्यता दिली, असा अरोपही करण्यात येत आहे.
