scorecardresearch

महावितरणच्या अभियंत्याला धक्काबुक्की, महिलेचा विनयभंग; आरोपीस सक्तमजुरी

प्रकरणात महावितरणचे सहायक अभियंता श्रीकांत बाळासाहेब गोरे यांनी फिर्याद दिली होती.

औरंगाबाद : वीजचोराविरुद्ध कारवाई करण्यासाठी गेलेल्या महावितरणच्या सहायक अभियंत्यासह कर्मचाऱ्यांना धक्काबुकी करून कर्मचारी महिलेचा विनभयंग केल्याप्रकरणी मकसुद खान मकबुल खान पठाण (३८), मोहसीन खान मकबुल खान पठाण (२५) आणि हरीभाऊ पंढरीनाथ राजगुरु (३३, सर्व रा. आसेगाव ता. गंगापुर) या तिघांना एक वर्षे सक्तमजुरीची शिक्षा जिल्हा व सत्र न्यायाधीश व्ही.आर. जगदाळे यांनी सुनावली.

प्रकरणात महावितरणचे सहायक अभियंता श्रीकांत बाळासाहेब गोरे यांनी फिर्याद दिली होती. त्यानुसार, ६ ऑगस्ट २०१८ रोजी गोरे हे पथकासह वीज चोरी करणाऱ्यांवर  कारवाई करण्यासाठी आसेगाव परिसरात गेले होते. दरम्यान आरोपी मकसुद खान याच्या घरातील विजेची तपासणी केली असता तो ती चोरी करीत असल्याचे समोर आले. त्यामुळे त्याच्या घराचा वीज पुरवठा खंडित करण्यात आला. चिडलेल्या आरोपीने गोरे यांची कॉलर पकडून धक्काबुक्की करुन मारहाण केली. पथकातील इतर कर्मचाऱ्यांनाही धक्काबुक्की करून धमकावले. तसेच पथकातील एका महिलेची ओढणी ओढून तिला ढकलून दिले. प्रकरणात दौलताबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

खटल्याच्या सुनावणीवेळी सहायक लोकाभियोक्ता मनीषा गंडले यांनी ६ साक्षीदारांचे जबाब नोंदवले. दोन्ही बाजूंच्या युक्तिवादानंतर व साक्ष-पुराव्यांवरून न्यायालयाने आरोपींना दोषी ठरवून तिघा आरोपींना एक वर्षे सक्तमजुरी आणि एका महिन्याच्या साध्या कारावासाची शिक्षा सुनावली.

मराठीतील सर्व औरंगाबाद ( Aurangabad ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Msedcl engineer pushed woman molested accused hard labor aurangabad action against power thieves ysh

ताज्या बातम्या