छत्रपती संभाजीनगर – महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने सवलतीच्या प्रवासासाठी सुरू केलेल्या एनसीएमसी अर्थात राष्ट्रीय समान परिवहन महामंडळाच्या प्रवासासाठी सवलतधारकांना अनिवार्य करण्यात येणाऱ्या २०० रुपयांच्या कार्डसाठीही लाच मागितली जात असल्याचा प्रकार समोर आला आहे. विशेष म्हणजे ही लाच मागणारे साधे ऑपरेटर पदावरील कर्मचारी आहेत. या प्रकारामुळे सर्वसामान्य आणि सवलत लागू असलेल्या प्रवाशांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे.
गंगापूर येथे ५०० रुपयांची लाच स्वीकारणाऱ्या एका ऑपरेटरला छत्रपती संभाजीनगर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने मंगळवारी दुपारी रंगेहाथ पकडले. याप्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात रात्री गुन्हा दाखल करून आरोपीस अटक करण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे.
भारत यशवंत राऊत (वय ३५), असे लाच मागणाऱ्याचे नाव आहे. राऊत गंगापूर बसस्थानकावरील एनसीएमसी कार्ड वितरण केंद्रात ऑपरेटर असून, तक्रारदाराकडे त्याने चार कार्डसाठी प्रति २५० रुपये याप्रकरणे एक हजार रुपयांची मागणी केली. एनसीएमसीसाठी प्रतिकार्ड १९९ रुपये एवढेच शुल्क आकारणी बंधनकारक असताना भारत राऊत याने प्रतिकार्ड २५० रुपये याप्रमाणे १ हजारांची मागणी केली. त्यातील ५०० रुपये स्वीकारताना १ सप्टेंबर रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या सापळा अधिकारी प्रतिभा आबूज व तपास अधिकारी अमोल सोनवणे यांनी लावलेल्या सापळ्यात भारत राऊत अडकला. याप्रकरणी गुन्हा दाखल करून भारत राऊत यास अटक करण्यात आली आहे.
अलिकडेच वाळूजमध्ये एका मुद्रांक शुल्क विक्रेत्यांने ५० रुपयांची लाच प्रति मुद्रांक शुल्क, अशी चार मुद्रांक शुल्कासाठी लाच मागितली होती. परंतु मागितलेली रक्कमही लाचच असल्याने आणि त्यासंदर्भाने तक्रार दाखल करण्यात आल्याने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कारवाई केली होती. ही घटना ताजी असतानाच आता राज्य परिवहन महामंडळाच्या एनसीएमसी कार्डसाठी २०० रुपये अशी प्रतिकार्ड लाच मागितल्याचे समोर आल्याने याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
