नांदेड: मुदखेड तालुका दुष्काळग्रस्त तालुक्यांच्या यादीतून वगळल्याच्या निषेधार्थ उबाठा शिवसेनेने मंगळवार (दि.२९) रोजी शासनाने काढलेला दुष्काळाचा जीआर जाळून आंदोलन केले. तहसील कार्यालय परिसरात घोषणाबाजी करीत तहसिलदार आनंद देऊळगावकर यांच्यामार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन सादर करण्यात आले. यावेळी तालुका दुष्काळग्रस्त घोषित करून शेतकऱ्यांना हेक्टरी १ लक्ष रुपये आर्थिक मदत द्यावी, तसेच इसापूर धरणाचे पाणी शेतीसाठी सोडावे, अशी मागणी करण्यात आली.
शिवसेनेचे संपर्कप्रमुख किशोर चंद्रकांत पोतदार, सहसंपर्क प्रमुख दयाल गिरी, शहरप्रमुख प्रकाश मारावार, जिल्हाप्रमुख बबन बारसे, उपजिल्हाप्रमुख माणिक लोमटे, अविनाश झमकडे यांच्या शिष्टमंडळाने तहसीलदार आनंद देऊळगावकर यांची भेट घेऊन मुदखेड तालुक्यातील दुष्काळी परिस्थितीबाबत यावेळी चर्चा केली.
तालुक्यात प्रत्यक्ष शेतातील परिस्थिती गंभीर असताना पर्जन्यमानाच्या चुकीच्या नोंदींच्या आधारे मुदखेडला दुष्काळग्रस्त यादीतून वगळण्यात आल्याचा आक्षेप यावेळी घेण्यात आला. पर्जन्यमानाच्या नोंदी करणाऱ्या स्वयंचलित हवामान केंद्रांची तपासणी का करण्यात आली नाही, असा सवाल उपस्थित करून हवामान केंद्रातील संभाव्य तांत्रिक बिघाडाकडेही शिष्टमंडळाने लक्ष वेधले.
तालुक्यातील सोयाबीन, कापूस, तूर, केळी, ऊस यांसह विविध पिकांचे नुकसान झाले असून शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. मुदखेड तालुक्यातील उर्वरित पिकांना पाण्याची तातडीने गरज असून उपलब्ध पाणीसाठ्याचा विचार करून इसापूर धरणाचे पाणी तातडीने शेतीसाठी सोडण्यात यावे, अशी विनंती तहसीलदारांकडे करण्यात आली. यावेळी राम चव्हाण, विजय बगाटे, महेश खेडकर, बालाजी पेनूरकर, रेणुका मोळके, गेदाबाई कांबळे, सुनील कदम, बालाजी कल्याणकर, संतोष आलेवाड, विश्वंभर पवार, माधव पावडे, विजय देशमुख यांच्यासह असंख्य शिवसैनिक उपस्थित होते.
‘आकडे नव्हे, शेतातील वास्तव पाहा’
मुदखेड तालुक्यातील शेतकऱ्यांची परिस्थिती गंभीर आहे. पर्जन्यमानाच्या नोंदी आणि प्रत्यक्ष शेतातील परिस्थितीत तफावत असेल तर हवामान केंद्रांची तपासणी करून वस्तुस्थिती समोर आणणे आवश्यक आहे. शासनाने केवळ कागदावरील आकडेवारीवर निर्णय न घेता प्रत्यक्ष पाहणी करून मुदखेडला तातडीने दुष्काळग्रस्त घोषित करावे. किशोर पोतदार, संपर्क प्रमुख – शिवसेना उबाठा.
प्रतिक्रिया – २
१९७२सारखा प्रचंड मोठा दुष्काळ समोर दिसतो आहे. सरकारने मुदखेड तालुक्यावर अन्याय केला आहे. तातडीने दुष्काळग्रस्त तालुक्यात मुदखेडचा समावेश करून या भागातील उर्वरित पिकांना जीवनदान देण्यासाठी इसापूर धरणाचे पाणी सोडावे. माणिक लोमटे उपजिल्हा प्रमुख, शिवसेना उबाठा
