छत्रपती संभाजीनगर : नांदेड जिल्ह्यातील मुदखेड आणि मुखेड हे दोन तालुके वगळता मराठवाड्यातील ७४ तालुक्यांत राज्य शासनाने दुष्काळ जाहीर केला आणि नांदेड जिल्ह्यात तुषार राठोड आणि अशोक चव्हाण या नेत्यांच्या अडचणी वाढल्या. या दोन्ही तालुके पावसाच्या निकषात बसले नाहीत, हे मतदारांना कसे सांगायचे असा पेच त्यांच्यासमोर निर्माण झाला आहे. तांत्रिक कारणामुळे झाले, दुसरी कळ लागू झाल्यावर आपणही दुष्काळी यादीत असू असे राठोड यांच्याकडून सांगण्यात येत आहे. अशाच आशयाचा एक मजकूर अशोक चव्हाण यांनीही समाजमाध्यमांद्वारे प्रसारित केला आहे.

मराठवाड्यात फक्त मुदखेड तालुक्यात सरासरीच्या १०० पेक्षा अधिक पाऊस नोंदविण्यात आला. तर मुखेडमध्ये सरासरीच्या ७५ ते १०० टक्के एवढा पाऊस झाला आणि पावसाचा खंडही अधिक नव्हता, परिणामी या दोन्ही तालुक्यांत दुष्काळाची पहिली कळ लागू होऊ शकली नाही, असे सांगण्यात येते. या अनुषंगाने आमदार तुषार राठोड यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, जून आणि जुलैमध्ये मतदारसंघात चांगला पाऊस झाला. पण पुढच्या दोन महिन्यांत पावसाचा खंडही मोठा आहे. पण ७५ टक्के पावसाचा निकष असल्याने तालुका वगळण्यात आला. पण जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा झाली आहे. डोंगराळ भाग असल्याने जमिनीची पाणी साठवून ठेवण्याची क्षमता कमी आहे. पिकाची वाढही खुंटली आहे. ही परिस्थिती मुख्यमंत्र्यांच्या कानावर घालू तसेच महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे उद्या दौऱ्यावर येणार आहेत, तेव्हा त्यांनाही अडचणी सांगू असे राठोड म्हणाले. खासदार अशोक चव्हाण यांनीही ही बाब मुख्यमंत्र्यांच्या कानावर घातली असून पत्रही लिहिले आहे. तांत्रिक कारणांमुळे दोन्ही तालुक्यांचा समावेश नसला तरी हे तालुके दुष्काळाच्या यादीत येतील, याबाबत सकारात्मक असल्याचे म्हटले आहे.

इतर सर्व ७४ तालुक्यांमध्ये दुष्काळ लागू झाल्याने शेतसारातून सूट, चालू वीज देयकातून माफी इत्यादींसह परीक्षा शुल्कही माफ होणार आहे. इयत्ता १० वी साठी ६३० रुपये व १२ वीच्या विद्यार्थ्यांसाठी ६५० रुपये, तर श्रेणी सुधार परीक्षा शुल्क ११३० रुपये आहे. हे शुल्क न भरता परीक्षा देण्याचे विभागाचे आदेश आल्यानंतर शुल्क न भरता परीक्षा अर्ज करता येईल, पण ज्यांनी शुल्क भरले आहे अशा विद्यार्थ्यांना ते परत केले जाईल, असे शालांत माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. दरम्यान, विद्यापीठाने स्वनिधीतून परीक्षा शुल्क भरावे आणि नंतर ते शासनाकडून घ्यावे, अशी मागणी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने केली आहे. आधी फी भरायची आणि मग परतावा मिळविण्यासाठी ही प्रक्रिया टाळावी, अशी मागणीही करण्यात आली आहे.

२५ ते ५० टक्के पाऊस झालेले तालुके

लातूर : निलंगा, चाकूर, शिरूर अनंतपाळ

धाराशिव : तुळजापूर, लोहारा

बीड : गेवराई

मराठवाड्यातील ४१ तालुक्यांत ५० ते ६५ टक्के पाऊस पडला. ४० तालुक्यांचा पावसाचा खंड २० ते ३० दिवसांचा आहे, तर १४ तालुक्यांमध्ये दीड महिन्यापासून पाऊस नाही. ५११ महसूल मंडळांपैकी २१५ महसूल मंडळांमध्ये २० ते ३० दिवसांचा, तर ६० महसूल मंडळांमध्ये ३० दिवसांपेक्षा अधिक पावसाचा खंड आहे.