नांदेड ः मुदखेड तालुक्यातील बारड गावापासून तोरणा तांड्यापर्यंत सुरू झालेला अवैध दारू विक्रीचा प्रश्न गंभीर बनला असून तोरणा तांडा गावाच्या नामफलकावरच ‘देशी दारू मिळेल’ असे लिहून ग्रामस्थांनी निष्क्रिय पोलीस प्रशासनावर संताप व्यक्त केला आहे. त्यामूळे निष्क्रिय ठरलेल्या स्थानिक पोलीस प्रशासनाऐवजी आता पोलीस उपमहानिरीक्षकांच्या विशेष पथकाची धाडसी कारवाई अपेक्षित आहे.
तालुक्यातील बारड, शेंबोली, तिरकसवाडी (शिवार), तोरणा तांडा सहीत अनेक गावात अवैध दारू विक्रीने खोलवर पाय रोवले आहेत. शेतमजुरी करणारे, कष्टाने उदरनिर्वाह करणारे अनेक कुटुंब आणि त्यातील तरुण वर्ग या विळख्यात अडकत असून घरातील कमाई दारूत वाहून जात आहे. परिणामी, कुटुंबातील तणाव वाढत आहेत. परिसरातील अवैध दारू विक्रीवर ठोस कारवाई होत नसल्याने अवैध दारूमुळे गाव परिसराचे सामाजिक स्वास्थ्य पोखरले आहे.
याच पार्श्वभूमीवर, बारड सारख्या परिसरात अवैध दारु विक्रीवर कडक आणि सातत्यपूर्ण कारवाईसाठी विशेष पथकाची गरज निर्माण झाली आहे. अवैध धंदे मोडीत काढण्यासाठी ओळखल्या जाणाऱ्या नांदेड परिक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक शहाजी उमापांच्या पथकाने या भागात मोहीम राबवणे गरजेचे झाले आहे. जिल्ह्यात शहाजी उमाप यांच्या नेतृत्वाखालील कारवाईमुळे अनेक ठिकाणी अवैध व्यवसायांवर लगाम बसल्याचे उदाहरणे असल्याने बारड व परिसरातील नागरिकांमध्ये आशा निर्माण झाली आहे.
काही गावात अवैध दारुंचे बॉक्स पाठविण्यासाठी वाहनांचा वापर होतो; परंतु याकडे पोलीस प्रशासनाचा कानाडोळा दिसून येतो. दरम्यान, प्रशासनानेही या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेत तातडीने संयुक्त मोहिम राबवावी, दोषींवर कठोर कारवाई करावी आणि गावांना या विळख्यातून मुक्त करावे, अशी तोरणा तांडा आणि बारड येथील व परिसरातील सर्वसामान्यांची अपेक्षा आहे.
तोरणा तांडा असो की, बारड परिसरातील लहान सहन अनेक गावांत सुरू असलेली अवैध दारूची विक्री थांबवण्याचे अधिकार ज्यांना आहेत, त्यांनी त्याचे निर्वहन करून सामाजिक स्वास्थ्य अबाधित ठेवावे, हीच अपेक्षा. उद्या सामाजिक स्वास्थ्य बिघडले तर त्यास प्रशासन जबाबदार असणार आहे. याचा प्रशासनाने गांभीर्याने विचार करावा.-प्रताप देशमुख बारडकर तालुकाध्यक्ष, काँग्रेस कमिटी मुदखेड.
बारड आणि परिसरात अवैध दारू, गुटखा आणि मटका विक्री सुरू आहे. याकडे पोलीस प्रशासनाचा कानाडोळा दिसून येतो. पोलीस प्रशासनाने कारवाई करून अवैध धंदे वाल्यांचे कंबरडे मोडून काढावे. – गजानन कल्याणकर, ग्रामस्थ, बारड
