छत्रपती संभाजीनगर : ‘मुद्रा’ कर्जाच्या थकबाकीचा आकडा दरवर्षी वाढत असल्याचे दिसून येत आहे. या वर्षी मार्च अखेरीस मुद्रा कर्जाची थकबाकी ६७३६ कोटी ५६ लाख रुपयांवर गेली असल्याची आकडेवारी राज्यस्तरीय बँकर्स समितीसमोर ठेवण्यात आली आहे.

गेल्या वर्षीच्या तुलनेत या वर्षी थकित रकमेत ११२० कोटी रुपयांची भर पडली. गेल्या वर्षी मार्च महिन्यात थकित कर्जाचा आकडा ५६१६ कोटी रुपये होता. कर्जवितरणाचा ओघ कायम असल्याने थकित कर्जाचे शेकडा प्रमाण मात्र आहे तेवढेच म्हणजे ११ टक्केच्या घरात असल्याचे दिसून येते.

मुद्रा कर्ज योजनेचे तीन गट आहेत. शिशू गटात ५० हजार रुपयापर्यंतचे कर्ज मिळते. या गटात २१ लाख ७० हजार ९३९ जणांना ४२३७ कोटी १४ लाख रुपयांचे कर्जवाटप झाले. ते भरले गेले नाहीच. पण एक वर्षापेक्षा अधिक काळ थकित असणारी कर्ज रक्कम १३१३ कोटी रुपये आहे. किशोर गटात कर्ज मिळण्याचे प्रमाण ५० हजार ते पाच लाख रुपये एवढे असून यामध्ये वाटप केलेल्या एकूण कर्जापैकी २५ हजार ५१७ कोटी रुपयांपैकी ३२४७ कोटी रुपयांचे कर्ज थकित आहे.

तरुण गटात १० लाख रुपयांपर्यंतचे कर्ज मिळते. या श्रेणीतील कर्ज २०८४ कोटी रुपये आहे. तर २० लाख रुपयांचा विशेष तरुण श्रेणीमध्ये २६२० कोटी रुपयांचे कर्ज देण्यात आले असून यात फक्त ८० कोटी रुपयांचे कर्ज थकित आहे. ही श्रेणी अलिकडेच सुरू करण्यात आली असल्याने यात कर्जवाटप अधिक नसल्याचे दिसून येते. वाढत जाणारे थकित कर्जाचे आकडे चक्रावून टाकणारे आहेत.

मुंबई, मंबई उपनगरे, पुणे, नागपूर यया शहरातील मुद्रा कर्जाचे आकडे वाढत असून थकबाकीही वाढत असल्याचे दिसून येत आहे. मुंबईमध्ये ५४६ कोटी, नागपूरमध्ये ४७४ कोटी रुपये तर पुणे थकबाकीमध्ये सर्वाधिक पुढे असून ही रक्कम ६९९ कोटी रुपये असल्याची आकडेवारी राज्य स्तरीय बँक समितीच्या अहवालातून दिसून येत आहे.

कर्ज वाटपाचा आकडा दरवर्षी वाढत असताना उद्योग व्यावसाय मात्र फारसे वाढताना दिसत नाहीत. आहे त्याच व्यावसायिकांना अधिकचे कर्ज उपलब्ध करुन देण्याकडे बँकाचा कल असतो. परिणामी ‘मुद्रा’ च्या परिणामकारकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहेत.