छत्रपती संभाजीनगर : वैजापूर व गंगापूर या दोन तालुक्यांसाठी बांधण्यात आलेल्या मुकणे, भाम, भावली आणि वाकी या धरणातून नाशिक महापालिका आणि इगतपुरी शहराच्या पिण्याच्या पाण्यासाठी आरक्षित केलेले पाणी अतिरिक्त असल्याचे आक्षेप मान्य करून हे पाणी कमी करण्याचा ठराव जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आलेल्या कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत घेण्यात आला. हा ठराव महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाकडे पाठविण्यात येणार आहे.
१०.५७ अब्ज घनफूट पाणी अनुज्ञेय असताना अतिरिक्त आरक्षण टाकून सिंचनासाठी केवळ ३.०५५ अब्ज घनफूट ( टीएमसी ) पाणी वितरणाचा कार्यक्रम आखण्यात आला होता. यास आक्षेप घेण्यात आले. सल्लागार समितीच्या बैठकीत पहिले आवर्तन १.५ अब्ज घनफूट करण्याचा निर्णय मंत्री राधाकृष्ण विखे यांनी जाहीर केला. गंगापूरचे आमदार प्रशांत बंब यांनी पाणी आरक्षणाच्या आकडेवारीवरून आक्षेप दाखल केले.
वैजापूर आणि गंगापूर या दोन तालुक्यांसाठी नांदूर मधमेश्वर धरणातून जलद गती कालव्याने पाणी द्यावे म्हणून वैजापूरमधील शेतकरी उपोषणास बसले होते. तसेच समृद्धी महामार्गावरही रस्तारोको आंदोलन करण्यात आल्याने पाणी वाद सुरू झाला होता. या अनुषंगाने जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे यांच्या बैठकीत आरक्षणि अतिरिक्त असेल तर तसे महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाला कळवावे, असे ठरविण्यात आले. यावेळी गंगापूरचे आमदार प्रशांत बंब यांनी चारही धरणावर अनुज्ञेय पाण्यातून नाशिक आणि इगतपुरीसाठी पिण्याच्या पाण्याचे आरक्षण कसे काय टाकले, असा प्रश्न उपस्थित करण्यात आला. यावर नाशिक महापालिकेसाठी ०.९८ अब्ज घनफूट आरक्षण टाकल्याचे अधिकाऱ्यांनी मान्य केले. तसेच वाकी, भावली, भाम धरणातून होणारा वहनव्यय अधिक असल्याचा अधिकाऱ्यांचा दावा होता. धरणासाठी राखीव पाणीतून अन्यत्र पाणी देण्यावर घेतलेल्या जोरदार आक्षेपानंतर हे आरक्षण रद्द करण्याचा ठराव मंजूर करण्यात आला. या बैठकीस खासदार संदीपान भुमरे, आमदार रमेश बोरनारे, भाजपचे दिनेश परदेशी, आमदार अंबादास दानवे यांची उपस्थिती होती.
पहिले आरक्षण दीड अब्ज घनफुटाचे
जलद गती कालव्यातून पहिले आरक्षण दीड अब्ज घनफुटापर्यंत वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला. एकूण तीन आवर्तने देण्याचे ठरविण्यात आले असून जानेवारी २०२७ मध्ये या अनुषंगाने स्वतंत्र बैठक घेतली जाईल, असे राधाकृष्ण विखे यांनी जाहीर केले. या बैठकीसाठी वैजापूरचे शेतकरी व उपोषणकर्ते पंडित शिंदे हे रुग्णवाहिकेतून बैठकीस आले होते. यावेळी पोलिसांचा मोठा बंदोबस्त होता.
