छत्रपती संभाजीनगर – पत्नीच्या नावे बनावट इसार पावती देऊन महापालिकेच्या पशु संवर्धन विकास अधिकाऱ्यास ३५ लाखांची फसवणूक केल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्यातील एकाला अटक केल्याची माहिती वेदांतनगर पोलीस ठाण्याच्या निरीक्षक प्रवीणा यादव यांनी दिली.

याप्रकरणी मनपाचे पशुसंवर्धन विकास अधिकारी शेख शाहेद शेख निझाम (वय ५५) यांनी फिर्याद दिली आहे. सदर गुन्ह्यामधील क्र. 1चा आरोपी मोहम्मद एजाज मोहम्मद रियाज वय 59वर्ष राहणार आरेश कॉलनी छत्रपती संभाजीनगर यांना काल रोजी अटक करण्यात आले व दोन दिवसाची पीसीआर मिळालेली आहे. इतर 4 आरोपी सध्या फरार आहेत.

त्यावरून मोहम्मद एजाज मोहम्मद रियाज, ताजुन्नीसा बेगम मोहम्मद एजाज, मोहम्मद इम्तीयाज मोहम्मद एजाज, मोहम्मद अदनान मोहम्मद एजाज (सर्व रा. आरेफ कॉलनी छत्रपती संभाजीनगर) व शिवकुमार घुरेलाल चव्हाण (रा. अमोदी हिल्स, मकबरा जवळ, पहाडसींगपुरा), अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.

या घटनेतील गुन्हा जानेवारी २०२३ ते २२ जानेवारी २०२६ या कालावधीत जिल्हा न्यायालयाच्या मागील जालाननगर भागात घडली. वरील कालावधीत वरील पाचही आरोपींनी संगणमत करुन, कट कारस्थान रचुन जालाननगर सीटी सर्व्हे क्र. १८८९४ चे १२८ क्षेत्रफळ १४७.३ चौरस मीटर या प्लॉटचा जी.पी.ए. धारक असलेबाबत सांगून संबंधित प्लॉट त्यांचे मालकीचा व त्यांचे नावे नसतांना, त्या प्लॉटचे आपसात बनावट इसारपावती तयार करुन त्या आधारे स्वमालकीचा आहे असे भासवले.

तसेच १६ फेब्रुवारी २०२३ रोजी फिर्यादी पशुसंवर्धन विकास अधिकाऱ्याची पत्नी सिद्दीकी यास्मीन फिरदोस यांचे नावे इसारपावती व करारनामा करुन देवुन ३५ लाख रुपये घेतले. त्यानंतर शिवकुमार चव्हाण व मोहंमद एजाज यांनी पैसे परत करण्याबाबत हमीपत्र करारनामा करुन दिला. या करारनाम्याच्या मुदतीत रक्कम परत न करता, पैसे परत करण्याबाबत वेळोवेळी, वेगवेगळी कारणे सांगून सर्वांनी नियोजनबद्धरित्या, कटकारस्थान व संगणमत करुन आर्थिक फसवणूक केली, असे तक्रारीत म्हटले आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सुपे यांच्याकडे दिला आहे.

प्लॉटबाबत खात्री केली असता ते प्लॉट हे दुसऱ्याच्या नावावर असल्याचे समजले. त्यामुळे त्या प्लॉटचा करारनामा करुन घेतला नाही. त्यानंतर एजाज यांच्या घरी जावून उर्वरीत रक्कम घेवन खरेदी खत करुन दया, किंवा रक्कम परत दया अशी विनंती केली. तेव्हा मोहंमद एजाज मोहंमद रियाज, मोहम्मद इम्तीयाज, मोहम्मद अदनान यांनी सांगितले की, शिवकुमार चव्हाण यांच्याकडुन त्यांना दुस-या व्यवहारातील प्लॉटचे पैसे परत मिळाले नाही. त्यामुळे तुमची रक्कम देवु शकत नाही. त्यांचेकडुन पैसे आल्यानंतर तुम्हाला देवु असे सांगितले. मोहंमद एजाज, त्यांची पत्नी ताजुन्नीसा बेगम त्यांची मुले मोहमद इम्तीयाज, मोहंमद अदनाम व घुरेलाल चव्हाण यांचे वागणुक, बोलणे याचा मला संशय आल्याने जालाननगर येथील दाखविलेल्या प्लॉटवर गेलो असता तेथे मोहंमद एजाज यांचे नावाचा बोर्ड नव्हता. तो प्लॉट जैनी जिनत अब्दुल अजिज यांच्या नावे असल्याचे आढळून आले, असे पशुसंवर्धन विकास अधिकारी शेख शाहेद शेख निझाम यांनी तकारीत म्हटले आहे.