जालना – प्रसिद्ध निर्माते, दिग्दर्शक नागराज मंजुळे यांनी त्यांच्या आगामी चित्रपट निर्माण करण्यात येणाऱ्या प्रकल्पाची माहिती परतूर येथे शुक्रवारी दिली. पुरस्कार समारंभात त्यांनी ही बायोपिक चित्रपटाची माहिती दिली. तत्पूर्वी बोलताना नागराज मंजुळे म्हणाले, गावखेड्यांत राहणारा, साधा कुर्ता-पायजमा आणि डोक्यावर टोपी घालणारा माणूसच खऱ्या अर्थाने हिरो आहे. ग्रामीण संस्कृती जपणारी आणि पुढे नेणारी माणसेच रिअल हिरो आहेत, असे मत नागराज मंजुळे यांनी शुक्रवारी परतूर येथे व्यक्त केले.
मराठवाडा सर्वोदय शिक्षण प्रसारक मंडळाच्या वतीने दिला जाणारा बाबासाहेब आकात स्मृती पुरस्कार डॉ. भागवत कटारे यांच्या हस्ते मंजुळे यांना प्रदान करण्यात आला. त्यावेळी उत्तर देतांना ते बोलत होते. अध्यक्षस्थानी संस्थेचे सचिव कपिल आकात होते. कवी दासू वैद्य, माजी सरपंच विलास आकात, डॉ. शिवाजी मदन, नाटककार राजकुमार तांगडे, अभिनेते संभाजी तांगडे, पटकथा लेखक बालाजी सुतार, अभिनेते प्रवीण डाळिंबकर, प्राचार्य डॉ. भारत खंदारे, डॉ. सुधाकर जाधव यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती.
कलाकृतीत कुणाचेही खंडण किंवा मंडन करण्याचा आपला हेतू कधीच नसतो. वास्तव परिस्थितीला अनुरूप जे आहे ते कलाकृतीत उतरवण्याचा आपण मनातून प्रयत्न करतो. ते लोकांना भावते. आगामी काळात ऑलिम्पिक वीर खाशाबा जाधव यांच्या जीवनावर चित्रपट करणार असल्याची घोषणाही निर्माते दिग्दर्शक नागराज मंजुळे यांनी केली.
या कार्यक्रमात कवी, गीतकार प्रा. डॉ. दासू वैद्य, कपिल आकात, प्राचार्य भारत खंदारे आदींची भाषणे या वेळी झाली. दरम्यान, शिक्षण, कला, क्रीडा, सामाजिक व राजकीय क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी असणाऱ्या महाराष्ट्रातील नामवंतांना हा दरवर्षी दिला जातो. पुरस्काराचे यावेळेस चौथे वर्ष आहे. जिल्हयातील दिवंगत नेते बाबासाहेब आकात यांच्या स्मृतीनिमित्त हा पुरस्कार देण्यात येतो.
नागराज मंजुळे यांचे चित्रपट
प्रसिद्ध निर्माते- दिग्दर्शक नागराज मंजुळे हे सैराट चित्रपटामुळे प्रकाश झोतात आले. यशस्वी दिग्दर्शक म्हणून ते प्रकाश झोतात आले. त्यानंतर त्यांचे फॅण्ड्री, नाळ, अमिताभ बच्चन यांना घेऊन काढलेला झुंड, त्यानंतरचा घर, बंदूक, बिर्याणी हा स्वतः अभिनय केलेला चित्रपट असून, परतूर येथे मंजुळे यांनी ऑलिम्पिक पदक विजेते खाशाबा जाधव यांच्या जीवनावर चित्रपट काढणार असल्याची घोषणा शुक्रवारी स्वतः मंजुळे यांनी केली. क्रीडा क्षेत्रावर आधारित त्यांचा हा दुसरा चित्रपट असेल. चरित्रात्मक चित्रपट (बायोपीक) त्यांचा आगामी प्रकल्प असणार आहे, हे त्यांच्या घोषणेतून स्पष्ट होत आहे.
