छत्रपती संभाजीनगर – वाढत्या तापमानाने मोरांची होरपळ होत आहे. पाणवठेही काही ठराविक अंतरावर असल्याने पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. या भटकंतीतच उष्माघाताचा धोका असून, तापमानाचा प्रजननावरही परिणाम होत असल्याचे वन्यजीव अभ्यासक सांगत आहेत. बीड जिल्ह्यातील नायगाव येथील राष्ट्रीय मयूर अभयारण्यातील मोर पाण्याच्या शोधार्थ नजीकच्या शिवारामध्ये भटकताना दिसत आहेत.
पाटोदा तालुक्यातील नायगाव हे देशातील एकमेव मयूर अभयारण्य असून, सुमारे २ हजार २०० हेक्टरपर्यंत विस्तारलेले आहे. या अभयारण्यात वनविभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार ४ हजारांवर मोर आहेत. अभयारण्यात अधिकतर ग्लिरिसिडिया किंवा गिरीपुष्पाची झाडे अधिक असून, उन्हाळ्याच्या सुमारासच या झाडांची पानगळ होते. परिणामी मोरांना पाणवठ्यापर्यंत जाताना सावलीही मिळेनासे चित्र असल्याचे वन्यजीव चळवळीतील कार्यकर्त्यांकडून सांगितले जाते. सध्या मराठवाड्यात ४२ च्या आसपास तापमान असून, १३ मे रोजी बहुतांश भागात ४३ अंशांवर तापमान पोहोचले होते. मोरांना ४० अंशांवरचेही तापमान तापदायक ठरताना दिसत आहे.
मोरांना उष्माघाताचा धोका
मोरांना ४० अंशांवरचेही तापमान सहन होत नाही. बऱ्याचवेळा उष्माघातामुळे बेशुद्ध पडण्याचीही शक्यता असते. सध्या सर्पराज्ञी केंद्रात उष्माघात झालेल्या मोरांची संख्या वाढली आहे. तापमानाचा मोरांच्या प्रजनन क्षमतेवरही परिणाम होतो. – सिद्धार्थ सोनवणे, मानद वन्यजीवरक्षक.
पशुचिकित्सालयाची गरज
नायगाव मयूर अभयारण्यात सहा ते सात हजारांवर मोर आहेत. मोरांना पाणवठे दूर असल्याने भटकंती करावी लागत आहे. उन्हाळ्यात पाणवठ्यातील पाणीही बराचकाळ गरम राहते. उष्माघात झाला तर नजीक उपचाराचे केंद्र नाही. २५ किमी अंतरावरील पाटोदा किंवा बीडला न्यावे लागते. पशुचिकित्सालयाची मागणी तीन वर्षांपासून करतो आहोत. जिल्हाधिकाऱ्यांनाही निवेदन दिले आहे. – सय्यद शाहीद हबीब, अध्यक्ष, मयूर मित्र मंडळ तथा माजी सरपंच, नायगाव.
टँकरद्वारे पाणीपुरवठा
मयूर अभयारण्यात सध्या चार हजारांवर मोर आहेत. २९ पाणवठे असून, नियमित टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे. उष्माघातचे कुठलीही लक्षणे अद्याप तरी समोर आली नाहीत. – रेवती कुलकर्णी, विभागीय वनाधिकारी.
प्राणी गणना
बुद्ध पोर्णिमेदिवशी नायगाव मयूर अभयारण्यातील झालेल्या पशुगणनेनुसार मोर २ हजार ७३, रान डुक्कर १५४, काळवीट ७३, चिंकारा ४३, ससे ३०, नीलगाय २४, सायाळ १९, कोल्हा ९, रान मांजर ३, लांडगे २, बिबटे २ तर उदमांजर १ आढळून आल्याची माहिती मिळाली आहे.
