छत्रपती संभाजीनगर – बीड जिल्ह्यातील अंबेजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाने हज यात्रेसाठी जाणाऱ्या भाविकांची वैद्यकीय तपासणी करण्यास असमर्थता दर्शवली आहे. या महाविद्यालयात दरवर्षीप्रमाणे होणारी हज यात्रेकरूंची वैद्यकीय तपासणीची सोय पूर्ववत करावी, असे पत्र केज मतदारसंघाच्या भाजप आमदार नमिता मुंदडा यांनी सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर व वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांना लिहिले आहे.

या पत्रात आमदार नमिता मुंदडा असं म्हणतात की, अंबाजोगाई शहर व तालुक्यातील हजयात्रेसाठी जाणाऱ्या भाविकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. अंबाजोगाई ते बीड हे अंतर सुमारे शंभर किलोमीटर असून बीडला जिल्हा रुग्णालयात जावे लागणे आर्थिक, शारीरिक व वेळेच्या दृष्टीनेही अत्यंत गैरसोयीचे आहे.

अंबेजोगाई येथे वैद्यकीय महाविद्यालय असताना केवळ जिल्हा रुग्णालयात वैद्यकीय तपासणीची सुविधा मर्यादित ठेवणे अन्यायकारक असल्याच्या भावना व्यक्त करण्यात येत आहेत. अंबेजोगाईसारख्या वैद्यकीय दृष्ट्या सक्षम ठिकाणी वैद्यकीय तपासणीची सुविधा बंद करणे योग्य नसून भाविकांमधून तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. त्यासाठी अंबेजोगाईतील वैद्यकीय महाविद्यालयात हजयात्रेकरूंची तपासणीची सोय असल्याची सुविधा पूर्ववत करावी, अशी मागणी आमदार मुंदडा यांनी केली आहे.

या संदर्भाने स्वामी रामानंद तीर्थ शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. शंकर धपाटे म्हणाले की, यावर्षीपासून जिल्हा रुग्णालयांमध्ये हज यात्रेकरूंच्या वैद्यकीय तपासणीच्या संदर्भाने एक पोर्टल सुरू करण्यात आले असून, त्याचा ओटिपी जिल्हा शल्यचिकित्सकांकडे येतो. आम्हीही नोंदणीची तयारी केली, परंतु ओटिपीची अडचण असल्याने पोर्टल खुले होत नाही. तसे शासनालाही कळवण्यात येणार आहे. रुग्णालयाने ४४ हजयात्रेकरूंचे वैद्यकीय तपासणी केली आहे.