नांदेड: मराठी भाषा गौरव दिनाच्या आठ दिवस आधीपासून या नगरीमध्ये विविध संस्थांच्या साहित्यिक, सांस्कृतिक आणि सांगीतिक सोहळ्यांची रेलचेल सुरू असताना या उत्सवी काळातच विसाव्या विद्रोही मराठी साहित्य संमेलनास शुक्रवारपासून प्रारंभ झाला. या संमेलनाचे औपचारिक उद्घाटन शनिवारी होत असून तीन दिवसांच्या संमेलनात भरगच्च कार्यक्रम समाविष्ट आहेत.

नांदेडची शैक्षणिक पंढरी समजल्या जाणार्‍या तसेच विख्यात समीक्षक नरहर कुरुंदकरांचा दीर्घकाळ संबंध राहिलेल्या पीपल्स आणि सायन्स कॉलेजच्या परिसरात सुप्रसिद्ध कवी लोकनाथ यशवंत यांच्या अध्यक्षतेखाली भरणार्‍या या संमेलनाचे उद्घाटन हिंदी साहित्यातील ख्यातनाम समीक्षक डॉ.बजरंग तिवारी यांच्या हस्ते आणि साहित्याचे अभ्यासक डॉ.मिलिंद आव्हाड यांच्या प्रमुख उपस्थितीत शनिवारी सकाळी १० ते दु.१२.३० या सत्रात होईल. या सत्रातच मावळते अध्यक्ष डॉ.अशोक राणा आपल्या पदाची सूत्रे लोकनाथ यशवंत यांच्याकडे सुपूर्द करतील. राहुल प्रधान हे संमेलनाचे स्वागताध्यक्ष आहेत.

या संमेलनात विविध क्षेत्रांतील मान्यवरांना विद्रोही जीवनगौरव पुरस्कार प्रदान केले जाणार आहेत. त्यामध्ये निवृत्त अधिकारी के.ई.हरिदास, डॉ.सुधीर गव्हाणे, नांदेडचे डॉ.व्यंकटेश काब्दे, प्रा.भगवंत क्षीरसागर, अ‍ॅड.अरविंद देशपांडे यांचा समावेश आहे. संमेलनाच्या विविध सत्रांमध्ये चंद्रशेखर शिखरे, डॉ.रेखा शेळके, डॉ.प्रतिभा अहिरे यांच्या अध्यक्षतेखाली तीन स्वतंत्र परिसंवाद होणार असून प्रसिद्ध पत्रकार राजू परुळेकर यांचे व्याख्यान २८ फेब्रुवारी रोजी होणार आहे. निमंत्रितांच्या तीन कविसंमेलनांसह तीन स्वतंत्र कविसंमेलनेही होणार आहेत. सुप्रसिद्ध सिनेनाट्य अभिनेते मिलिंद शिंदे यांची मुलाखत प्रा.डॉ.राजेंद्र गोणारकर हे घेणार आहेत. पत्रकार ज्ञानेश महाराव यांचे ‘शाहिरांचे गणराज्य-लोकशाहीचा सांस्कृतिक प्रवास’ हे संगीतमय व्याख्यानही होणार आहे.

संमेलनाच्या पूर्वसंध्येला दलित पँथरचे संस्थापक पद्मश्री नामदेव ढसाळ यांच्या कवितांवर आधारित ‘भयंकराच्या दरवाजात कोण’ हे नृत्यनाट्य सादर करण्यात आले. या कलाप्रयोगाचे दिग्दर्शन मयूर शितोळे यांनी केले. संमेलन परिसरात कलादालन उभारण्यात आले असून महाराष्ट्रातील पन्नासहून अधिक प्रकाशकांनी त्यात सहभाग नोंदविला आहे. संमेलनाचा समारोप १ मार्च रोजी दिल्ली येथील इतिहासकार प्रोफेसर रतनलाल आणि अन्य मान्यवरांच्या उपस्थितीत होणार आहे. या संमेलनानिमित्त ठिकठिकाणांहून येणार्‍या साहित्यिक व निमंत्रितांच्या स्वागतासाठी संयोजन समिती सज्ज झाली असल्याचे राहुल प्रधान आणि प्रा.राजेंद्र गोणारकर यांनी सांगितले.

विद्रोही साहित्य संमेलन दोन नामांकित महाविद्यालयाच्या परिसरामध्ये भरत असतानाच शहरातील यशवंत महाविद्यालयाच्या परिसरात दिवंगत शंकरराव चव्हाण आणि कुसुमताई चव्हाण यांच्या स्मरणार्थ कुसुम महोत्सव सुरू झाला आहे. या महोत्सवाचे उद्घाटनही शुक्रवारी झाले. या महोत्सवामध्ये तीन दिवसांत विविध कार्यक्रमांचे नियोजन करण्यात आले आहे.