नांदेड : नांदेड जिल्ह्यात मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात झालेल्या वादळी वाऱ्यामुळे केळीच्या बागा भुईसपाट झाल्याने केळी उत्पादकांचे मोठे नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर काँगेस खा. रवींद्र चव्हाण यांनी निवघा (ता. मुदखेड) येथे नुकसानग्रस्त केळीच्या बांधावर जाऊन मंगळवारी (दि.0२) रोजी प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधत त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या तसेच संबंधित अधिकाऱ्यांना तात्काळ पंचनामे करून मध्यप्रदेशच्या धर्तीवर हेक्टरी दोन लक्ष रू. नुकसानभरपाई देण्याची मागणी केली.
गतवर्षी प्रमाणेच याही वर्षी जिल्ह्यातील मुदखेड व अर्धापूर तालुक्यात वाळवाच्या अवकाळी पावसाने आणि वादळी वाऱ्यामुळे विविध गावातील केळी फळबागांचे मोठे नुकसान झाले आहे. या नुकसानग्रस्त निवघा भागाचा दौरा काँग्रेस खा. रवींद्र चव्हाण यांनी केला. यावेळी त्यांनी बळवंत रामराम पवार यांच्या भुईसपाट झालेल्या केळीच्या बांधावर भेट देऊन पाहणी केली. भेटी दरम्यान, खा. चव्हाण यांनी राज्यातील नुकसानग्रस्त केळी उत्पादकांना मिळणारी मदत अत्यंत अपुरी असल्याचे सांगितले.
सरसकट नुकसान विचारात घेऊन जास्तीत जास्त शेतकऱ्यांना मदतीचा लाभ मिळावा, यासाठी प्रशासनाने प्रयत्न करावेत, असे त्यांनी अधिकाऱ्यांना सांगितले. वादळी वाऱ्यामुळे झालेल्या नुकसानीचा उल्लेख करताना खा. चव्हाण यांनी गावनिहाय स्वयंचलित हवामान केंद्रांची आवश्यकता देखील अधोरेखित केली. “निवघा येथे वादळ झाले, मात्र हवामान केंद्र बारड येथे आहे. अशा परिस्थितीत स्थानिक हवामानाची अचूक नोंद कशी होणार? यामुळे पीकविमा मिळवताना शेतकऱ्यांना अडचणी निर्माण होतात,” असेही त्यांनी नमूद केले.
नुकसानग्रस्त शेतकरी बळवंत पवार, संजयराव पवार, दशरथ आऊलवाड, दत्ता पवार, देवानंद पवार, संजय नरडिले यांच्याशी चर्चा करून खा. चव्हाण यांनी त्यांना धीर दिला. यावेळी कृषी अधिकारी राजकुमारी देशमुख, तलाठी मुळेकर उपस्थित होते. पाहणी दरम्यान स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष हणमंत राजेगोरे, काँग्रेस जिल्हाध्यक्ष डॉ. विठ्ठल पावडे, काँग्रेस कार्यकर्ते संदीपकुमार देशमुख, विश्वनाथ पवार, महेश देशमुख आदी उपस्थित होते.
केळी नुकसानीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस कार्यकर्ते संदीपकुमार देशमुख यांनी राज्याचे फलोत्पादन मंत्री भरत गोगावले यांच्याशी दूरध्वनीवर संपर्क साधून नांदेड जिल्ह्यातील नुकसानीची माहिती दिली. मध्यप्रदेशमध्ये नुकसानग्रस्त केळी उत्पादकांना हेक्टरी दोन लाख रुपयांचे अनुदान दिले जाते. त्याच धर्तीवर महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनाही हेक्टरी दोन लाख रुपयांची नुकसानभरपाई जाहीर करावी, अशी मागणी त्यांनी यावेळी केली.
“गतवर्षीप्रमाणेच यावर्षीही केळी उत्पादकांचे मोठे नुकसान झाले आहे. यंदा केळीला चांगला बाजारभाव मिळत असतानाच वादळाने शेतकऱ्यांच्या आशांवर पाणी फेरले. त्यामुळे मध्यप्रदेशच्या धर्तीवर महाराष्ट्र शासनाने केळी उत्पादकांना हेक्टरी दोन लाख रुपयांची मदत द्यावी. रवींद्र चव्हाण,
लोकसभा सदस्य, नांदेड
