नांदेड ः प्रस्तावित नांदेड-बिदर या बहुप्रतिक्षित नवीन रेल्वे मार्गाच्या उभारणीसाठी कर्नाटक सरकारने संमती व आपल्या वाट्याचा निधी द्यावा, अशी मागणी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री खा.अशोक चव्हाण यांनी कर्नाटकचे मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांच्याकडे केली आहे.
संसदेच्या अधिवेशनादरम्यान खा.अशोक चव्हाण यांची डी.के.शिवकुमार यांच्याशी भेट झाली. यावेळी त्यांनी या अत्यंत महत्त्वाच्या रेल्वे प्रकल्पावर चर्चा केली व त्यानंतर त्यांना सविस्तर पत्रही पाठवले. याशिवाय राज्यसभेचे विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांच्याकडेही खा. चव्हाण यांनी हीच मागणी केली आहे.
कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना दिलेल्या पत्रात चव्हाण यांनी म्हटले आहे की, केंद्र सरकारने नांदेड (महाराष्ट्र) आणि बिदर (कर्नाटक) या नवीन रेल्वे मार्गाला केंद्र आणि संबंधित राज्य सरकारांमध्ये ५०/५० टक्के खर्च विभागणीच्या तत्त्वावर मंजुरी दिली आहे. हा प्रकल्प सुमारे १५७ किलोमीटरचा असून, त्यातील सुमारे १०० किलोमीटरचा रेल्वे मार्ग महाराष्ट्रात, तर उर्वरित कर्नाटकात आहे.
या नवीन रेल्वे मार्गामुळे नांदेड येथील ‘श्री हजूर साहेब’ आणि बिदर येथील ‘नानक झिरा साहेब’ ही शीख समुदायाची दोन अतिशय महत्त्वाची पवित्र तीर्थक्षेत्रे जोडली जाणार आहेत. या थेट कनेक्टिव्हिटीमुळे भाविकांची सुविधा होणार असून, या भागातील पर्यटन, व्यापार आणि रोजगार निर्मितीला गती मिळेल. तसेच, नांदेड आणि बंगळूरू दरम्यानचे अंतर कमी होणार आहे तसेच महाराष्ट्र सरकारने या प्रकल्पाच्या खर्चातील आपला ५० टक्के वाटा उचलण्यास यापूर्वीच मंजुरी दिली आहे, याकडे खा.अशोक चव्हाण यांनी डी. के. शिवकुमार यांचे लक्ष वेधले.
