नांदेड : राज्यातील २९ महापालिकांच्या निवडणुकीत उतरलेल्या भाजपासह अन्य पक्ष वेगवेगळ्या ठिकाणी स्थानिक कटकटींना तोंड देत असताना नांदेड-वाघाळा मनपाच्या निवडणुकीसाठी आपला जाहीरनामा सर्वप्रथम जारी करून नांदेड महानगर भाजपाने ‘आम्ही जिंकणारच’ असा संकल्प नववर्षाच्या पहिल्याच दिवशी नांदेडकरांसमोर सोडला.
भाजपाच्या जाहीरनामा समितीचे राज्याचे प्रमुख माधव भांडारी यांच्या हस्ते वरील जाहीरनाम्याचे येथे प्रकाशन करण्यात आले. खा.अशोक चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमास व्यासपीठावर खा.अजित गोपछडे, आ.श्रीजया चव्हाण, माजी राज्यमंत्री डी.पी.सावंत, महानगराध्यक्ष अमरनाथ राजूरकर, स्थानिक प्रवक्ते संतुका पांडागळे यांच्यासह आजी-माजी पदाधिकारी उपस्थित होते.
भांडारी यांनी गेल्या आठवड्यात भाजपाच्या ठिकठिकाणच्या जाहीरनाम्यासंदर्भात सर्व संबंधितांची बैठक घेतली होती. ५ ते ७ जानेवारी दरम्यान पक्षाचे सर्व महापालिकांसाठीचे जाहीरनामे प्रकाशित झाले पाहिजेत, अशी सूचना त्यांनी दिली होती. पण नांदेड भाजपाने आपला बहुरंगी जाहीरनामा त्यापूर्वीच जारी केला.
या जाहीरनाम्याच्या प्रारंभी खा.अशोक चव्हाण यांनी ‘चला, आता परिवर्तन घडवू या’ या मथळ्याखाली आपले सविस्तर निवेदन नांदेडकरांसमोर ठेवले. पुढील काळातल्या शहर नियोजनातील उद्दिष्टे काय आहेत, त्यासाठी काय करावे लागणार आहे हे सारे नमूद करून पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांच्या कल्पनेतील सुंदर, स्वच्छ आणि हरित शहर करण्याचा मनोदय त्यांनी व्यक्त केला.
नांदेडवासीयांनी मनपामध्ये २५ वर्षांहून अधिक काळ एका पक्षाला सातत्याने संधी दिली; पण निसर्गामध्ये जसे स्वाभाविक बदल होतात, तसे राजकारण व समाजकारण या क्षेत्रातही बदल होतात, असे नमूद करून त्यांनी यावेळी भाजपाला संधी देण्याचे आवाहन मतदारांना केले. नंतर आपल्या अध्यक्षीय भाषणात त्यांनी भविष्यातील कामे आणि योजना यावर विस्तृत विवेचन केले.
जाहीरनाम्याचे प्रकाशन केल्यानंतर माधव भांडारी यांनीही नांदेड भाजपाने अत्यंत चांगला जाहीरनामा लोकांसमोर ठेवला असल्याचे गौरवोद्गार काढले. नांदेड मनपाच्या इतिहासात भाजपा प्रथमच ८१पैकी ६७ जागा लढवत असल्याचा उल्लेख त्यांनी केला. विकसित नांदेडसाठी भाजपाकडे एकहाती सत्ता सोपवा, असे आवाहन त्यांनी केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.डॉ.विश्वाधार देशमुख यांनी केले. याप्रसंगी जाहीरनामा निर्मितीतील संपादक संतुका पांडागळे, छायाचित्रकार सचिन मोहिते, अतुल आणि रुपेश बुर्रेवार यांचा खा.चव्हाण यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.
अटलजी आणि नानाजी यांचे पुतळे !
नांदेड न.प. ते नांदेड मनपा या सुमारे पाऊणशे वर्षांच्या प्रवासात नांदेडमध्ये राष्ट्रपुरुषांसोबतच मागील शतकातील लालबहादूर शास्त्री, सरदार वल्लभभाई पटेल, शंकरराव चव्हाण, वसंतराव नाईक या राजकीय नेत्यांचे पुतळे वेगवेगळ्या भागात उभारले गेले. हे सारे काँग्रेस राजवटीमध्ये घडले. आता भाजपाने नांदेडमध्ये माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्यासह सामाजिक आणि रचनात्मक कार्यात देशपातळीवर काम केलेले भारतरत्न नानाजी देशमुख यांचे पुतळे उभारण्याचे जाहीर केले आहे.
