नांदेड ः विकासासाठी दिलेली जागा विकसित न करता व ठरलेल्या कराराचे उल्लंघन व छळ केल्याचा आरोप नातेवाईकांनी करत उत्तरीय तपासणी केलेला एका वयोवृद्धाचा मृतदेह विकासकाच्या दारात नेऊन ठेवल्याची घटना शनिवार (दि.१) रोजी नांदेडच्या अशोकनगर भागात घडली. घटनेची माहिती समजताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.

शहरातील अशोकनगर स्थित रहिवासी सदानंद सावंत (वय ७०) यांनी आपली काही जागा मागील चार वर्षांपूर्वी येथील विकासक कौस्तुभ फरांदे यांना विकास करण्यासाठी दिली होती. या जागेचा विकास करण्यासाठी करारही करण्यात आला होता. जागेचा विकास होईपर्यंत काही भाडे देण्याचे ठरले होते; परंतु विकासक फरांदे यांनी जागेचा कुठलाच विकास न केल्यामुळे सदानंद सावंत हे तणावात होते.

या दरम्यान सावंत यांना हृदयविकाराचा झटका आला. यादरम्यान त्यांना शहरातील एका खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान सावंत यांचा मृत्यू झाला. त्यानंतर सावंत यांच्यावर शासकीय रुग्णालयात उत्तरीय तपासणी करण्यात आली. उत्तरीय तपासणीनंतर त्यांच्या नातेवाईकांनी सावंत यांचा मृतदेह थेट विकासक असलेल्या कौस्तुभ फरांदे यांच्या अशोकनगरस्थित सुमन या निवासस्थानी नेला. यामुळे फरांदे कुटुंबीय गोंधळलेल्या अवस्थेत होते.

सावंत यांच्या नातेवाईकांनी फरांदे कुटुंबीयांवर आरोप करत जागा बळकावण्याचा प्रयत्न केल्याचे सांगितले. या घटनेची माहिती समजताच भाग्यनगर पोलीस स्थानकाचे पोलीस निरीक्षक संतोष तांबे यांच्यासह मोठा पोलीस फौजफाटा घटनास्थळी दाखल झाला. सदरचे वृत्त लिहीपर्यंत सदानंद सावंत यांचा मृतदेह फरांदे यांच्या निवासस्थानीच होता.