नांदेड : देशभर जनगणनेचे काम वेगाने सुरू असून सध्या दुसऱ्या टप्प्यातील गृहभेटींची प्रक्रिया सुरू आहे. दि. १४ जूनपर्यंत हे काम पूर्ण करणे अभिप्रेत आहे. दरम्यान, नांदेड महानगरपालिका हद्दीत नियुक्त १०८५ प्रगणकांपैकी २१३ जणांनी अद्याप कामच सुरू केलेले नाही. तर इतरांचे काम देखील अतिशय संथगतीने सुरू असल्याचे दिसून येते. जिल्ह्यात सध्या तापमानाचा पारा ४४ अंशावर असून यामुळे कार्यक्षमतेवर नकारात्मक प्रभाव पडत असल्याचे दिसून येते.
स्वातंत्र्यानंतरच्या आठव्या जनगणनेला दि. १ मे पासून सुरूवात झाली आहे. दि. १५ मे पर्यंतच्या १५ दिवसांमध्ये डिजीटल पद्धतीने स्वगणना करण्याची मुदत होती. अशा पद्धतीचा हा पहिलाच प्रयोग होता. यात सुद्धा नांदेड जिल्ह्यात अतिशय निराशाजनक प्रतिसाद मिळाला. केवळ २७ हजार ४६१ कुटुंबांची स्वगणना झाली आहे. त्यामुळे प्रगणकांचे काम प्रचंड वाढले आहे. एकीकडे सूर्य आग ओकत आहे. लग्नसराई संपली असली तरी उन्हाळी सुट्यांमुळे अनेक कुटुंबं धार्मिक सहलीसाठी किंवा थंड हवेच्या ठिकाणी पर्यटनाला गेली आहेत. अनेक ठिकाणी प्रगणकांना माहिती भरुन घेण्यासाठी बराच वेळ लागतो आहे. काही कुटुंबांकडून पुरेसा प्रतिसाद मिळत नसल्याच्या तक्रारी आहेत.
उपरोक्त परिस्थितीत नांदेड महानगरपालिकेच्या हद्दीत जनगणनेचे काम अतिशय संथ गतीने सुरू असल्याचा अहवाल असून आयुक्त डाॅ. महेशकुमार डोईफोडे यांनी ही बाब गांभीर्याने घेतली आहे. प्राप्त माहितीनुसार नांदेड महानगरपालिकेच्या हद्दीतील जनगणनेसाठी एकूण एक हजार 85 प्रगणकांची नियुक्ती करण्यात आली आहे. पैकी त्यांची विभागणी सहा विभागात करण्यात आली आहे. एकूण प्रगणकांपैकी 213 जणांनी अद्याप काम सुरुच केले नाही. सर्वाधिक संख्या विभाग क्र. २ मध्ये १०७ जणांना कार्यारंभासाठी अद्याप मुहूर्त मिळालेला नाही.
वास्तविक गृहभेटींची प्रक्रिया सुरू होऊन दहा दिवस होत आले, या कालावधीत केवळ १० प्रगणकांचे काम पूर्ण झाले आहे. कामाची एकूण टक्केवारी केवळ ०.९२ एवढीच आहे. हा टप्पा दि. १४ जून रोजी संपणार असून उन्हाचा जोर कमी झाल्यानंतर जून महिन्यात कामाला वेग येईल, असे चित्र आहे. जनगणनेच्या कामावर जिल्हाधिकारी राहुल कर्डिले स्वतः लक्ष ठेवून आहेत. याबाबत सातत्याने आढावा घेतला जात असून ग्रामीण भागात सुद्धा काम कासवगतीने सुरू असल्याचे दिसून येते.
त्या प्रगणकांनी काम सुरू केले – डाॅ. डोईफोडे
महापालिका हद्दीत नियुक्त २१३ प्रगणकांना जनगणनेच्या कार्यारंभासाठी मुहूर्त मिळत नसल्याची माहिती हाती आल्यानंतर आयुक्त डॉ. महेशकुमार डोईफोडे यांच्याशी संपर्क साधला असता, रविवारी (दि. २४) सर्वांनी काम सुरू केल्याचे ते म्हणाले. निर्धारित मुदतीत दुसऱ्या टप्प्यातील काम पूर्ण होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
