शहर व परिसरात सर्रास आकडे टाकून वीजचोरी होत असली तरीही महावितरणच्या अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केल्याने सामान्य नागरिकांना त्याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे. नियमित वीजबिल भरणाऱ्या ग्राहकांना भारनियमनाचा भार सहन करावा लागत आहे.
नांदेड शहर व परिसरात गेल्या काही दिवसांपासून वीजचोरीच्या घटना मोठय़ा प्रमाणावर वाढल्या आहेत. वीजचोरीचे प्रमाण वाढले असले तरीही महावितरणकडून कोणत्याही ठोस उपाययोजना केल्या जात नाहीत. काही दिवसांपूर्वी लोकमित्रनगर परिसरात एका खासगी कंत्राटदाराची वीजचोरी उघड झाली होती पण त्याच्याविरुद्ध कोणतीही कारवाई झाली नाही किंवा त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे धाडस संबंधित अभियंत्याने दाखवले नाही. विशेष म्हणजे या अभियंत्याने वीजचोरीचे चित्रीकरणही केले होते. पण कोणतीही कारवाई न झाल्याने संबंधित कंत्राटदाराने पुन्हा वीजचोरीचा प्रयत्न केला.
गेल्या आठवडय़ात शहरातल्या जयभीमनगर, क्रांतिनगर या भागात विद्युत तारांवर आकडे टाकून वीजचोरी मोठय़ा प्रमाणावर सुरू असल्याची बाब उघड झाली होती. तब्बल ११०० आकडे महावितरणच्या अधिकाऱ्यांनी पोलीस बंदोबस्तात काढले. या कारवाईत ६० हजार फूट वायर, इलेक्ट्रीक शेगडी, हीटर आदी साहित्य जप्त करण्यात आले. स्वत:चा व इतरांचाही जीव धोक्यात घालून २०० ते ३०० फुटापर्यंत लांब केबल टाकून ही वीजचोरी सुरू होती, असेही निदर्शनास आले. आठ दिवस झाले महावितरणच्या अधिकाऱ्यांनी याबाबत पोलीस कारवाई करण्याचे धाडस मात्र दाखवले नाही.