नांदेड : सहकारमहर्षी पद्मश्री श्यामराव कदम, माजी मंत्री कमलकिशोर कदम आदी दिग्गजांची परंपरा सांगणार्या नांदेड तालुक्यातील लिंबगाव ह्या गावामध्ये जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी बुधवारी रात्री मुक्काम ठोकला. निमित्त होते, ‘एक दिवस मुक्काम खेड्यामध्ये’ या उपक्रमाचा. त्यांच्या या वास्तव्यामुळे लिंबगावकरांनी ‘विजेच्या लपंडावातून’ एक दिवसापुरती मुक्तता झाली!
बुधवारची दैनंदिन-कार्यालयीन कामे पूर्ण झाल्यानंतर कर्डिले नांदेडपासून १५ कि.मी. अंतरावर असलेल्या वरील गावात रात्रौ ८च्या सुमारास पोहोचले. ते गावात येणार आणि रात्रभर मुक्काम करणार, याची माहिती ग्रामस्थांना नव्हती. गावात आल्यावर विविध कामांची पाहणी करतानाच त्यांनी ग्रामस्थांशी संवाद साधला.
जिल्हाधिकारी कर्डिले यांनी प्राथमिक आरोग्य केंद्र, स्मशानभूमी परिसरातील वृक्षारोपण, घरकुल लाभार्थी, संजय गांधी व इंदिरा गांधी निराधार योजनेचे लाभार्थी तसेच अंत्योदय योजनेतील कुटुंबांना प्रत्यक्ष भेट दिली. गावातील विविध समस्या आणि नागरिकांच्या अडचणी जाणून घेण्यासाठी बैठक घेतली. यामध्ये स्थानिक प्रश्नांवर चर्चा करून संबंधित अधिकार्यांना आवश्यक त्या सूचना दिल्या. तसेच शेतीतील आधुनिक तंत्रज्ञान, नवीन संशोधन, पीककर्ज आणि पीकविमा योजनांबाबत शेतकर्यांना मार्गदर्शन केले.
यावेळी उपविभागीय अधिकारी डॉ.सचिन खल्लाळ, तहसीलदार संजय वारकड, गटविकास अधिकारी प्रवीण सुरडकर, तालुका कृषी अधिकारी संजय चातरमल, साहाय्यक पो.नि.बोधनकर, तालुका आरोग्य अधिकारी डॉ.मुंडे, ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे उपअभियंता देशमुख, नायब तहसीलदार स्वप्नील दिग्गलवार व सुनील माचेवाड, पो.उप.नि.सय्यद, मंडळ अधिकारी अनिरुद्ध जोंधळे, तलाठी मंजुषा जाधव यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
नांदेडमधील प्रख्यात सुघटन शल्यचिकित्सक (प्लॅस्टिक सर्जन) डॉ.संजय कदम यांची वरील गावात शेतजमीन आहे. जिल्हाधिकारी कर्डिले यांनी पाहणी व भेटीगाठींनंतर डॉ.कदम यांच्या शेतामध्ये मुक्काम केल्याचे सांगण्यात आले. कर्डिले व इतर अधिकार्यांनी शेतामध्येच रात्रीचे भोजन घेतले. सकाळी ते नांदेडला परतले.
