नांदेड : नांदेड पॅटर्न म्हणजे काँग्रेसच्या विचारांचा, स्वाभिमानाचा आणि आत्मविश्वासाचा पॅटर्न आहे. केंद्र व राज्य सरकारच्या शेतकरी आणि सर्वसामान्य जनतेच्या धोरणाविरुद्ध लढा उभा करण्यासाठी, झोपेचे सोंग घेतलेल्या या सरकारला जागे करण्यासाठी काँग्रेसचा हा विशाल आसूड मोर्चा आहे. या मोर्चाच्या माध्यमातून दुसऱ्या क्रांतीची सुरुवात होईल, असा खणखणीत इशारा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी शासनाला दिला.
मंगळवारी दुपारी जिल्हा व शहर काँग्रेस काँग्रेस कार्यालयातून या आसूड मोर्चाची सुरुवात झाली. तत्पूर्वी मोर्चाला संबोधित करताना सकाळ यांनी केंद्र व राज्य सरकारवर घनाघाती टीका केली. शेतकऱ्यांच्या शेतीमालाला हमीभाव नाही, बेरोजगारांच्या हाताला काम नाही, महिला सुरक्षित नाहीत, शेतकऱ्यांना खोटे आश्वासने देऊन बड्या उद्योजकांना कर्जमाफी दिली जाते.परंतु देशात दररोज शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत असतानाही शेतकऱ्यांंना कर्जमाफी दिली जात नाही, अशी सडकून टीका सपकाळ यांनी केली.
देशाचे अर्थशास्त्र उलट्या दिशेने फिरत आहे. पेट्रोल, डिझेल व सिलेंडर ्च्या किमती प्रचंड वाढल्या आहेत. खाद्यतेल, सर्व प्रकारच्या डाळी महागल्या आहेत, असे असताना पंतप्रधान मोदी यांनी अदानी आणि अंबानींसह इतर बड्या उद्योजकांचे कर्ज माफ केले आहे. देशातील नागरिकांना बचत करण्याचे व विदेश यात्रा न करण्याचा सल्ला देणारे मोदी मात्र विदेश यात्रा काही सोडत नाहीत. असाही घनाघात त्यांनी केला.
यावेळी खासदार रवींद्र चव्हाण, जिल्हाध्यक्ष विठ्ठल पावडे, शहराध्यक्ष अब्दुल गफार, यशपाल भिंगे, हनमंत पाटील बेटमोगरेकर, अब्दुल सत्तार श्रावण रेपनवाड, रेखा चव्हाण, रामदास पाटील, सुरेंद्र घोडजकर, महेश देशमुख, तिरुपती कोंडेकर बालाजी गाडे शंकर शिंदे एकनाथ मोरे आदींची व्यासपीठावर उपस्थिती होती. यावेळी नांदेड दक्षिणचे जिल्हाध्यक्ष खासदार रवींद्र चव्हाण, उत्तरचे जिल्हाध्यक्ष विठ्ठल पावडे आणि शहराध्यक्ष अब्दुल गफार यांचा पदग्रहण सोहळा सपकाळ यांच्या उपस्थितीत पार पडला.
बैलगाड्या, ट्रॅक्टर्सवर बसून शेतकऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी हातात आसूड घेऊन सरकार विरुद्ध प्रचंड घोषणाबाजी केली. हा मोर्चा मुख्य मार्गावरून जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. काँग्रेसच्या आसूड मोर्चाने शहरातील जनतेचे लक्ष वेधून घेतले होते. या मोर्चात प्रचंड संख्येने शेतकरी कार्यकर्ते, पदाधिकारी सहभागी झाले होते.
पुढील निवडणुका स्वबळावर-खासदार रवींद्र चव्हाण सत्ताधाऱ्यांकडून दडपशाहीचे राजकारण सुरू आहे. नांदेडची अवस्था अत्यंत बकाल झाली असून नागरिकांना चार दिवस आड पाणी मिळत आहे. जागोजागी रस्ते खोदून ठेवले आहेत. विकासाचा पत्ता नाही. अशी टीका खासदार रवींद्र चव्हाण यांनी यावेळी केली.
विधान परिषद निवडणुकीत काँग्रेसचे रामदास पाटील सुमठाणकर यांनी मोठ्या मनाने उमेदवारी अर्ज मागे घेतला. परंतु ऐनवेळी महाविकास आघाडीचे खासदार फुटले. आता यापुढे सर्व निवडणुका स्वबळावर लढण्यास काँग्रेस सक्षम आहे, त्यासाठी पक्षश्रेष्ठींनी आम्हाला बळ द्यावे, अशी विनंती खासदार रवींद्र चव्हाण यांनी सपकाळ यांना केली.
