नांदेड : दीड वर्षांपूर्वीच्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीपाठोपाठ स्थानिक स्वराज्य संस्थांच्या रणसंग्रामातही पक्षाचे पानीपत झाल्यानंतर काँग्रेस पक्षाने ‘संघटन सृजन’ कार्यक्रमांतर्गत राज्यातील जिल्हा काँग्रेस संघटनेत व्यापक बदल करण्याची तयारी सुरू केली असून नांदेड जिल्ह्यातील तीनही जिल्हाध्यक्षांची उचलबांगडी केली जाणार आहे.

काँग्रेसच्या प्रदेश कार्यालयात मंगळवारी झालेल्या बैठकीसाठी नांदेड जिल्ह्यातून पक्षाचे खासदार प्रा.रवींद्र चव्हाण यांच्यासह विद्यमान जिल्हाध्यक्ष तसेच जिल्ह्यातील प्रदेश पदाधिकार्‍यांना पाचारण करण्यात आले होते. संघटन सृजन मोहिमेअंतर्गत अ.भा.काँग्रेस महासमितीने राज्यातील सर्व जिल्ह्यांसाठी निरीक्षकांची नियुक्ती केली आहे. नांदेड जिल्ह्यासाठी तेलंगणातील हरकला वेणूगोपाल राव यांना निरीक्षक करण्यात आले आहे. त्यांच्या मदतीसाठी प्रदेश काँग्रेसने माजी मंत्री अ‍ॅड.यशोमती ठाकूर यांची समन्वयकपदी नियुक्ती केली आहे, तर नांदेडचे खासदार रवींद्र चव्हाण यांच्यावर लातूरची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.

२०२४च्या लोकसभा निवडणुकीत नांदेड मतदारसंघात काँग्रेसने भाजपाच्या ताब्यातील जागा आपल्याकडे खेचून घेतली. नंतर वर्षाच्या आतच झालेल्या पोटनिवडणुकीतही काँग्रेसने ही जागा राखली; पण नंतरच्या विधानसभा निवडणुकीत या पक्षाला जिल्ह्यात एकही जागा मिळाली नाही. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीतही पक्षाची मोठी घसरण झाली. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील तीनही जिल्हाध्यक्ष बदला, या मागणीने जोर धरला.

काँग्रेसच्या संघटन सृजन कार्यक्रमांतर्गत येत्या काही दिवसांत पक्षाने नियुक्त केलेले निरीक्षक व समन्वयक नांदेडला येणार असून पक्षाने दिलेल्या सूचनेनुसार ते संघटनात्मक बाबींचा आढावा घेणार आहेत. जिल्हाध्यक्ष, जिल्ह्याची कार्यकारिणी तसेच तालुकाध्यक्ष या सर्व पदांच्या नव्याने नियुक्त्या होणार आहेत. नांदेड जिल्ह्यामध्ये काही प्रमुख कार्यकर्त्यांची जिल्हाध्यक्ष पदासाठी मोर्चेबांधणी सुरू झाली आहे. मुंबईतील बैठक व्यवस्थित पार पडल्याचे प्रदेश पदाधिकारी डॉ.श्रावण रॅपनवाड यांनी सांगितले.