नांदेड : नांदेड जिल्हा परिषद तसेच जिल्ह्यातील पंचायत समित्यांच्या निवडणुकांच्या अनुषंगाने आपल्या कार्यक्षेत्रातील जिल्हा पक्ष संघटनेत घाऊक नियुक्त्या करतानाच नव्या पदाधिकार्‍यांना पहिल्या बैठकीतच तंबी देणारे काँग्रेस जिल्हाध्यक्ष हनमंतराव पाटील बेटमोगरेकर यांनी केलेल्या तालुकाध्यक्षांच्या नियुक्त्या काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनी रद्द केल्या आहेत.

सोळा तालुक्यांत विभागलेल्या जिल्ह्याच्या ग्रामीण भागासाठी काँग्रेस पक्षाने दोन जिल्हाध्यक्ष नेमले असून दक्षिण जिल्ह्याची धुरा वाहणारे माजी आमदार बेटमोगरेकर यांनी अलीकडे नायगाव येथे झालेल्या बैठकीत आधीचे काही तालुका (ब्लॉक) अध्यक्ष बदलून नव्या तालुकाध्यक्षांना नियुक्ती पत्रे बहाल केली होती. या बैठकीतील त्यांचे जोशपूर्ण भाषण पक्ष संघटनेत वादग्रस्त ठरले होते.

वरील बैठकीत बेटमोगरेकर यांनी लोहा तालुका काँग्रेस अध्यक्षपदी कलंबर येथील गणेश घोरबांड यांची नियुक्ती केली होती. त्यांच्यासोबत देगलूर व अन्य तालुक्यांच्या नियुक्त्या त्यांनी केल्या. त्यानंतर लोहा तालुका काँग्रेस समितीचे अध्यक्ष मधुकर दिघेे यांनी प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्याकडे धाव घेत जिल्हाध्यक्षांनी चुकीच्या पद्धतीने केलेल्या नियुक्त्यांकडे लक्ष वेधले. त्यांनी दिलेल्या निवेदनाची तातडीने दखल घेण्यात आली.

प्रदेश काँग्रेसचे वरिष्ठ उपाध्यक्ष गणेश पाटील यांनी बेटमोगरेकर यांना एक पत्र पाठविले असून तालुका (ब्लॉक) अध्यक्षांच्या नियुक्त्यांचे अधिकार प्रदेशाध्यक्षांना आहेत, जिल्हाध्यक्षांना नाही असे त्यात नमूद केले. प्रदेशाध्यक्ष सपकाळ यांनी लोहा तालुका काँग्रेस अध्यक्षपदी मधुकर दिघे हेच कायम राहतील, असे स्पष्ट केल्यामुळे बेटमोगरेकर यांनी जेथे तालुकाध्यक्ष नियुक्त केले त्या नियुक्त्या रद्द झाल्याचे सांगण्यात येत आहे. नायगावच्या बैठकीस प्रदेश काँग्रेसचा एक पदाधिकारी हजर होता. बेटमोगरेकर यांनी केलेल्या नियुक्त्या बेकायदेशीर असल्याचे या पदाधिकार्‍याने आधीच म्हटले होते. त्यावर आता प्रदेश काँग्रेसने शिक्कामोर्तब केले आहे.

जिल्हाध्यक्ष बेटमोगरेकर यांनी महिला काँग्रेस संघटनेतही हस्तक्षेप केला होता. देगलूर तालुका महिला काँग्रेस कमिटीच्या तालुकाध्यक्षपदी त्यांनी डॉ.पूजा गायकवाड यांची परस्पर नियुक्ती केली होती. त्याविरुद्ध महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष संध्या सव्वालाखे यांच्याकडे तक्रार करण्यात आल्यानंतर त्यांनी डॉ.गायकवाड यांची नियुक्ती ग्राह्य धरल्या जाणार नाही, असे एका पत्रातून स्पष्ट केले. या पत्राची प्रत बेटमोगरेकर यांनाही पाठविण्यात आली होती.

माजी खासदार वसंतराव चव्हाण हयात असेपर्यंत नांदेड जिल्ह्यातील काँग्रेस पक्षसंघटना त्यांच्या अधिपत्याखाली सुरळीत चालली होती; पण त्यांच्या पश्चात संघटनेमध्ये शिस्त राहिलेली नाही. स्थानिक पदाधिकार्‍यांत बेबनाव निर्माण झाला असून एकंदर कारभारामुळे प्रदेशाध्यक्षांची डोकेदुखी वाढली असल्याचे त्यांच्या काही निकटवर्तीयांचे म्हणणे आहे. नांदेड मनपात काँग्रेसला एक स्वीकृत सदस्य नियुक्त करण्यास वाव आहे; पण या जागेवर निवडणुकीत पराभूत झालेल्या एका माजी नगरसेवकास नियुक्त करण्याच्या हालचाली सुरू झाल्या होत्या. या मुद्यावर काही कार्यकर्त्यांनी प्रदेशाध्यक्षांकडे तक्रार केली होती. त्यानंतर प्रदेश काँग्रेसने एक पत्र जारी करून निवडणुकीमध्ये पराभूत झालेल्या उमेदवारास स्वीकृत सदस्य करता येणार नाही, असे येथे कळविले.

जिल्हाध्यक्ष बदलण्याची मागणी !

जिल्ह्यातील काही कार्यकर्त्यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्षांकडे अलीकडेच एक निवेदन पाठविले. त्यात जिल्हाध्यक्ष बेटमोगरेकर हे भाजपाधार्जीणे असल्याचा आरोप करून त्यांच्या जागी नवा जिल्हाध्यक्ष नियुक्त करण्याची मागणी करण्यात आली. जिल्हाध्यक्षांनी केलेल्या बेकायदेशीर नियुक्त्यांकडेही या कार्यकर्त्यांनी प्रदेशाध्यक्षांचे लक्ष वेधले. त्यांच्या कार्यक्षेत्रांत काँग्रेसची परिस्थिती अतिशय बिकट झाल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.