नांदेड – नांदेड शहर सलग तिसऱ्यादिवशी घडलेल्या पाचव्या खुनाची घटनेने अक्षरशः हादरून गेले. नांदेडकरांची सोमवारची पहाटच खुनाच्या घटनेने उजाडली असून, रिअल इस्टेटमधील ३२ वर्षीय तरुण व्यावसायिकाची श्रीनगरसारख्या शहराच्या मध्यवर्ती वस्तीत पाच ते सहा जणांच्या टोळक्याने येऊन धारदार शस्त्राने हल्ला करून हत्या करण्यात आली. सोनू कल्याणकर असे खून झालेल्या तरुणाचे नाव असल्याची माहिती पोलिसांनी दिली. हत्या झालेले सोनू कल्याणकर हे शिंदे गटाच्या युवा सेनेचे शहराध्यक्ष होते.

सध्या घटनास्थळी भाग्यनगर पोलीस ठाण्याचे निरीक्षक संतोष तांबे, स्थानिक गुन्हे शाखेचे पथक, फॉरेन्सिक टीम, श्वान पथक दाखल असून, पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात हलवण्यात आला आहे. दोन दिवसात चार खून भाग्यनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडले आहेत.

दोन दिवसांपूर्वी दोन टोळ्यांच्या वर्चस्वाच्या लढाईतून तिहेरी हत्याकांड घडले असून, त्यात एका टोळीतील दोघांचा व दुसऱ्या टोळीतील प्रमुखाचा समावेश होता. अरजितसिंग चव्हाण हा धुरंधर चित्रपट पाहून मध्यरात्री घरी जाताना एका टोळीकडून त्याचा खून करण्यात आला होता. तर अरजितसिंगच्या भावाने सूडातून दुसऱ्या टोळीतील सय्यद आवेज व मोहम्मद अरबाज यांचा शासकीय रुग्णालयात जाऊन खून केला होता.

या घटनेच्या दुसऱ्याच दिवशी, शनिवारी मध्यरात्री रणजितसिंग तबेलावाला यांची हत्या करण्यात आली. या प्रकरणी दोन भावांना पोलिसांनी अटक केली आहे. तर सोमवारी पहाटे सोनू कल्याणकर या तरुण व्यावसायिकाची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. सोनू कल्याणकर हे जमीन खरेदी-विक्रीच्या व्यवसायात असले तरी त्यांचा सामाजिक कार्यातही सहभाग असायचा. तीन वर्षांपूर्वीही त्यांच्यावर हल्ला झालेला होता. त्यांच्या आई या आदर्श शिक्षिका पुरस्कार प्राप्त असून, हल्ला नेमका कोणत्या कारणातून झाला, खंडणीचा काही पदर आहे की, जमीन खरेदी-विक्रीतून निर्माण झालेले वाद, या कंगोऱ्यातूनही तपास होत असल्याचे सांगण्यात येत आहे.

नांदेडमध्ये दोन दिवसात पोलिसांकडून गुन्हेगारी जगतातील अनेकांची धरपकड सुरू आहे. अरजितसिंगचा खून करणाऱ्या दुसऱ्या गटातील अनिल व साईलाला या दोघांवरही एमपीडीए अंतर्गत कारवाई करण्यात आलेली होती.