नांदेड : वर्चस्वाच्या वादातून विविध गुन्हे करणार्या २४ गुन्हेगारांवर ‘मकोका’ कलम लावत त्या कलमांच्या दृष्टीने तपास करण्याचे आदेश नांदेड परिक्षेत्राचे विशेष पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप यांनी गुरुवारी रात्री दिले आहेत. यामध्ये दोन मयत गुन्हेगारांचा समावेश आहे. पोलीस अधीक्षक अबिनाशकुमार यांनी गुन्हेगारांवर वचक राहावी यासाठी ‘ऑपरेशन क्रॅकडाऊन’ मोहिम हाती घेतली आहे. या मोहिमेअंतर्गत गुन्हे करणार्या आरोपींना स्थानबद्ध तसेच हद्दपार करण्यात येत आहे. शहरातील शांतता अबाधित राहावी यासाठी पोलीस दलाकडून गुन्हेगारांच्या मुसक्या आवळण्याचे काम सुरू आहे.
अभिलेखावरील सक्रिय गुन्हेगारांची यादी २+ स्कीमअंतर्गत करण्याच्या सूचना पोलीस अधीक्षक अबिनाशकुमार यांनी जिल्ह्यातील पोलीस निरीक्षकांना दिल्या होत्या. यानुसार भाग्यनगर व विमानतळ पोलीस स्थानकाचे पोलीस निरीक्षक यांनी ४ एप्रिल रोजी कॅनॉल रोडवरील इ-स्क्वेअरजवळ घडलेल्या दोन गटांमधील वर्चस्ववादातील खुनाच्या तीन घटनांचा तसेच विमानतळ पोलीस स्थानकाच्या हद्दीत २६ एप्रिल रोजी आपआपसातील वर्चस्ववादाच्या घटनांचा संदर्भ देत या दोन्ही हद्दीतील २४ गुन्हेगारांवर ‘मकोका’ कायद्यातील कलमांचा वापर करून तपास करण्याची परवानगी मागितली होती.
दरम्यान पोलीस उपमहानिरीक्षक यांनी ‘मकोका’ कायद्याच्या कलमांचा वापर करण्यास परवानगी दिली आहे. जिल्ह्यातील संघटित व सराईत गुन्हेगारांवर चाप लावण्यासाठी विशेष कारवाई करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.
‘मकोका’अंतर्गत या गुन्हेगारांवर होणार कारवाई!
संघटित गुन्हे करत वर्चस्वासाठी लढणार्या तसेच स्वतःचे आर्थिक हित जोपासण्यासाठी गुन्हेगारी करणार्या दीपक पवार (वय २४), रोहित खिल्लारे (वय १९), आकाश लुळे (वय २४), पप्पू ऊर्फ लालबा गजलवाड (वय २२), राजेश पवार (वय २०), अविनाश चव्हाण, रोशन हळदे (वय २२), प्रशिक ऊर्फ परशा ओढणे (वय २५), चंद्रशेखर ऊर्फ चंद्या पाईकराव (वय २५), सोहेल ऊर्फ चिंधी पठाण (वय २५), मो.तोफीक (वय २५), साईश्री ऊर्फ साईलाला गहेरवार (वय २६), जयकुमार ऊर्फ सोनू राऊत (वय २३), शाकेर खान (वय ३०), शे.शाहरुख ऊर्फ कबुतर (वय २९), शे.उबेद (वय २३), दिग्विजय नरागुडे (वय २२), मन्मथ मंगरुळे (वय २५), नीतेश इंगळे (वय २२), गौरव गहेरवार (वय ३०), स.आवेज (वय २७), मो.अरबाज (वय २३), इलियास ऊर्फ काला इल्लुखान, शे.शाहरूख ऊर्फ हंटर (वय ३१) या सराईत गुन्हेगारांवर ‘मकोका’ अंतर्गत कारवाई होणार आहे.
