नांदेड : दुहेरी हत्याकांडातील आरोपींचा शोध सुरू असतानाच शनिवारी रात्री पूर्ववैमनस्यातून एका तरुणाची निर्घृण हत्या करण्यात आली. या प्रकरणात दोन आरोपींना ताब्यात घेण्यात आलेे. दरम्यान शहरातील वाढत्या गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीवर पोलीस अधीक्षक अबिनाशकुमार यांनी शहरातील सर्व पोलीस ठाण्यातील अधिकार्यांची रविवारी बैठक घेऊन कान उघाडणी केल्याचे सांगण्यात आले.
नांदेड शहरात शनिवारी मध्यरात्री इ-स्क्वेअर परिसरातील मॉललगत दोन टोळ्यांमध्ये झालेल्या वादात तिघांचा मृत्यू झाला. या प्रकरणात भाग्यनगर पोलीस ठाण्यात परस्पर विरोधी गुन्हे दाखल करण्यात आले असून चौघांना अटक करण्यात आली. ही घटना ताजी असतानाच शनिवारी रात्री उशिरा मुरमुरा गल्ली येथे रज्जूसिंघ ऊर्फ रणजीतसिंघ तबेलेवाले (वय २५) या तरुणाची धारदार शस्त्राने वार करून हत्या करण्यात आली. दोघांनी ही हत्या केल्यानंतर पोलिसांनी तपासाची वेगाने फिरवत प्रेमज्योतसिंघ परविंदरसिंघ कांचवाले (वय २५) व मनप्रीतसिंघ परविंदरसिंघ कांचवाले (वय २३) रा.अबचलनगर, नांदेड या दोघांना अटक करण्यात आली.
पूर्ववैमनस्यातून ही हत्या झाल्याचे सांगण्यात आले. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन स्वतः पोलीस अधीक्षक घटनास्थळी पोहोचले. त्यांनी आवश्यक त्या सूचना करत नाकाबंदी केली आणि नांदेड शहरातून पसार होऊ पाहणार्या वरील दोन आरोपींच्या वजीराबाद पसिरातून पहाटे मुसक्या आवळल्या.
शहरात शनिवारी तिहेरी हत्याकांड झाल्यानंतर नांदेडसह अन्य काही जिल्ह्यांत पोलीस पथकं पाठविण्यात आली आहेत. या तिहेरी हत्याकांडातील आणखी काही आरोपी पोलिसांच्या रडारवर आहेत. दरम्यान मयत तिघांवर शनिवारी दुपारनंतर धार्मिक विधी पूर्ण करून अंत्यसंस्कार करण्यात आले.
नांदेड शहरात स्वतःचे अस्तित्व दाखविण्यासाठी वेगवेगळ्या टोळ्या उदयास येत आहेत. काही पोलीस ठाण्यातील गुन्हे शाखेचे कर्मचारी-अधिकारी अन्य कामांकडे विशेष रूची दाखवत असल्यामुळे अशा गुन्हेगारांचे मनोधैर्य दिवसेंदिवस वाढत चालले आहे. तिहेरी हत्याकांडातील चार आरोपींना रविवारी न्यायालयापुढे उभे केले असता न्यायालयाने त्यांना पोलीस कोठडी सुनावली आहे.
दरम्यान, शहरातील टोळी युद्धाच्या उदयानंतर पोलीस अधीक्षक अबिनाशकुमार यांनी सहा पोलीस ठाण्यातील अधिकार्यांची, गुन्हे शाखेच्या कर्मचार्यांची एक बैठक घेतली. सुटीचा दिवस असून रविवारी झालेल्या या बैठकीत पोलीस अधीक्षकांनी काही जणांची कान उघाडणी केल्यानंतर वातानुकुलित कक्षात अनेकांना घाम फूटल्याचे सांगण्यात आले. यापुढे कोणत्याही परिस्थितीत रेकॉर्डवरच्या सराईत गुन्हेगारांवर प्रतिबंधात्मक कारवाईवर भर द्या, असे आदेश त्यांनी पोलीस ठाण्यातील अधिकार्यांना दिले.
नांदेड शहरातील गेल्या दोन दिवसांतील घडलेल्या घटना टोळी युद्धातून घडल्या आहेत. आतापर्यंत तिहेरी हत्याकांडात चार जणांना तर रज्जूसिंघ याच्या हत्येप्रकरणी दोघांना ताब्यात घेण्यात आले आहे. आणखी काही आरोपी आमच्या रडारवर आहेत. त्यांच्या अटकेसाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्यात आल्या आहेत. नागरिकांनी संयम बाळगून आपल्याकडील माहिती नजीकच्या पोलीस ठाण्याला द्यावी. – अबिनाशकुमार, पोलीस अधीक्षक, नांदेड
