नांदेड : नोव्हेंबरपासून फेब्रुवारीच्या दुसर्‍या आठवड्यापर्यंत शहर आणि जिल्ह्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची धामधूम चालल्यानंतर या महिन्याच्या शेवटच्या दहा दिवसांत नांदेडमध्ये वेगवेगळ्या संस्थांतर्फे सांस्कृतिक आणि सांगीतिक कार्यक्रमांची ‘धून’ निनादणार आहे. हे सर्व कार्यक्रम सत्ताधारी भाजपाच्या स्थानिक नेत्यांच्या पुढाकारातून होत आहेत. त्यामध्ये खा.अशोक चव्हाण यांना नांदेड भूषण पुरस्कार प्रदान करण्याच्या सोहळ्याचाही समावेश आहे.

मनपा निवडणूक संपल्यानंतर माजी नगरसेवक अ‍ॅड.दिलीप ठाकूर यांच्या पुढाकारातून २१ आणि २२ फेब्रुवारी रोजी होणार्‍या ‘नरेन्द्र-देवेन्द्र’ महोत्सवाच्या कार्यक्रमांची घोषणा करण्यात आली. मागील काही दिवसांपासून या कार्यक्रमाची वेगवेगळ्या माध्यमांतून शहरात जोरदार प्रसिद्धी सुरू आहे. यंदाच्या महोत्सवात खा.अशोक चव्हाण यांच्याशिवाय वेगवेगळ्या क्षेत्रांतील अन्य चार मान्यवरांना नांदेड भूषण पुरस्काराने सन्मानित केले जाणार आहे. कवि संमेलनासह इतर वेगवेगळ्या कार्यक्रमांचा महोत्सवामध्ये समावेश असून संयोजकांनी वेगवेगळ्या बाबींवर बक्षीसांची घोषणा करत नांदेडकरांचे लक्ष वेधून घेतले आहे. वरील महोत्सवाच्या आयोजनाची तयारी सुरू असतानाच २७ फेब्रुवारी ते १ मार्च दरम्यानच्या कुसुम महोत्सवाची घोषणा आ.श्रीजया अशोक चव्हाण यांनी शुक्रवारी येथे केली.

डॉ.शंकरराव व कुसुमताई चव्हाण यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ होणार्‍या या महोत्सवाचे यंदा सहावे वर्ष आहे. २७ फेब्रुवारीच्या मराठी भाषा गौरवदिनी ‘द फोक मराठी’ ह्या महाराष्ट्राच्या संस्कृतीचे दर्शन घडविणार्‍या सांगीतिक कार्यक्रमाने वरील महोत्सवाचा प्रारंभ होईल. दुसर्‍या दिवशी हिंदी चित्रपट क्षेत्रातील नायिकांवर आधारित कलर्स ऑफ बॉलीवूड या फॅशन शोचे आयोजन करण्यात आले आहे, तर १ मार्च रोजी पद्मश्री पुरस्कार प्राप्त सुप्रसिद्ध गायक कैलास खेर यांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.

वरील सर्व कार्यक्रम यशवंत महाविद्यालयाच्या पटांगणावर होणार असून त्यानिमित्ताने जिल्ह्यातील महिला बचतगट तसेच स्थानिक उत्पादकांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचा भाग म्हणून शॉपिंग व फूड फेस्टिवलचेही आयोजन करण्यात आल्याची माहिती आ.श्रीजया चव्हाण यांनी दिली.

संगीत शंकर दरबार

शारदा भवन एज्युकेशन सोसायटीतर्फे २५ ते २७ फेब्रुवारी दरम्यान संगीत शंकर दरबारचे आयोजन करण्यात आले आहे. यंदाच्या कार्यक्रमासाठी सरोदवादक अनुपम जोशी, शास्त्रीय गायनातील रूचिरा केदार, पंडित रघुनंदन पणशीकर, आदित्य मोडक, अनुराधा कुबेर यांना आमंत्रित करण्यात आले आहे. डॉ.मैसूर मंजुनाथ व मैसूर नागराज यांची व्हायोलिन जुगलबंदी होणार आहे. २७ फेब्रुवारी रोजी सकाळच्या सत्रात मराठी दिनानिमित्त ‘माय मराठी, सूर मराठी’ हा मंगेश बोरगावकर यांचा कार्यक्रम सादर होणार आहे. या महोत्सवाचे उद्घाटन जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या हस्ते २५ फेब्रुवारी रोजी होईल. यंदा लातूर येथील डॉ.राम बोरगावकर यांचा सन्मान केला जाणार आहे. हे सर्व कार्यक्रम यशवंत कॉलेजच्या प्रांगणात होणार असल्याचे डी.पी.सावंत यांनी जाहीर केले.