नांदेड : बँक खात्यात जमा झालेली रक्कम परस्पर उचलून घेणार्या नांदेडमधील दोन आरोपींवर सायबर पोलीस स्थानकात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. दोन वेगवेगळ्या घटना घडल्या असल्याचे पोलिसांनी सांगितले. वरील दोन्ही घटना फेब्रुवारी २०२६ या कालावधीत घडल्या आहेत, तर गुन्हा ३१ जुलै रोजी दाखल करण्यात आला आहे.
नवीन नांदेड भागातील रा.बीडी कॉलनी साईनगर सिडको येथील आरोपी नीलेश प्रभाकर वासमवार याच्या बँक ऑफ बडोदा सिडको शाखेच्या खात्यात ९ लाख रूपयांची रक्कम जमा झाली होती. त्यापैकी आरोपी नीलेश याने या रकमेपैकी २० हजार रूपये एटीएमद्वारे व ८ लाख ८० हजार रूपये धनादेशाद्वारे काढून घेतल्याची तक्रार केंद्र शासनाच्या सायबर क्राइम रिपोर्टिंग (एनसीसीआरपी) व समन्वय पोर्टलच्या माध्यमातून केली. याची खातरजमा केल्यानंतर आरोपीने फसवणुकीची रक्कम स्वीकारण्यासाठी बँक खात्याचा वापर केला असल्याची तक्रार पोलीस जमादार राजेंद्र सिटीकर यांनी दिल्यावरून सायबर पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दुसर्या एका घटनेत शहराच्या काबरानगर भागातील आरोपी कैलास दत्तराव लिंगायत याने नांदेड मचर्र्ंट्स बँक शाखा नांदेड येथील बँक खात्यामध्ये फसवणुकीची २१ लाख रूपयांची रक्कम जमा केल्याची तक्रार वरील पोर्टलद्वारे केली होती. या बाबीची खातरजमा केल्यानंतर आरोपी कैलास लिंगायत याने फसवणुकीची रक्कम स्वीकारण्यासाठी आपल्या बँक खात्याचा वापर केल्याचे उघड झाल्यानंतर पो.कॉ. काशिनाथ कारखेडे यांच्या तक्रारीवरून सायबर पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या दोन्ही प्रकरणांचा अधिक तपास पो.नि.वसंत सप्रे हे करीत आहेत.
