नांदेड : भाऊराव चव्हाण सहकारी साखर कारखान्याच्या स्थापनेपासून संस्थापक या नात्याने संस्थेच्या आजवरच्या सर्व वार्षिक सर्वसाधारण सभांना हजर राहणारे अशोक शंकरराव चव्हाण यंदा नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या वार्षिक सभेत मागील अनेक वर्षांपासूनच्या ‘रजापर्वा’तून मुक्त होण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे!
ही बाब वर वर साधी किंवा औपचारिक वाटत असली, तरी अडीच वर्षांपूर्वी भाजपामध्ये प्रवेश केल्यानंतर चव्हाण यांच्या कार्यशैलीमध्ये वरून-खाली असा बदल झालेला आहे. अलीकडेच झालेल्या निवडणुकीत या बँकेमध्ये त्यांनी प्रथमच आपल्या पक्षाचे सर्वाधिक उमेदवार निवडून आणले. बँकेचा नवा अध्यक्ष त्यांच्या मतानुसार निवडला जाईल, असे मानले जात होते; पण शेवटी मुख्यमंत्र्यांच्या पसंतीनुसार भाजपा आमदार डॉ.तुषार राठोड हे बँकेचे अध्यक्ष झाले आणि खळखळ न करता चव्हाण यांना त्यास संमती द्यावी लागली होती.
जिल्हा बँकेची येत्या सोमवारी होणारी ९९वी वार्षिक सर्वसाधारण सभा आर्थिक वर्ष २०२५-२६ या सालातली असली, तरी तत्कालीन अध्यक्ष भास्करराव खतगावकर हे नव्या संचालक मंडळामध्ये नाहीत त्यामुळे वरील सभा डॉ.तुषार गोविंदराव राठोड यांच्या अध्यक्षतेखाली होणार असे जाहीर झाले आहे. बँकेतल्या सत्ताधारी गटाचे स्थानिक नेते तसेच बँकेचे एक क्रियाशील सभासद या नात्याने खा.चव्हाण यांनी या सभेस उपस्थित राहण्याचे मान्य केले असल्याचे सांगण्यात आले.
वरील संस्थेमध्ये २००५ ते २०१५ दरम्यान प्रशासकीय राजवट होती. त्यानंतर २०१६ साली पुन्हा लोकनियुक्त संचालक मंडळ दाखल झाले. तेव्हापासून झालेल्या प्रत्येक वार्षिक सर्वसाधारण सभेस हजर राहण्याचे चव्हाण यांनी टाळले; पण कायद्यातील तरतुदीनुसार त्यांनी प्रत्येक सभेपूर्वी लिखित स्वरूपात रजा पाठविण्याची दक्षता घेतल्यामुळे अनुपस्थितीबद्दल त्यांच्या सभासदत्वावर गंडांतर आले नाही. (आता गतवर्षीपासून अनुपस्थितीबद्दल रजा देण्याची तरतूद वगळण्यात आली आहे.)
२०२१ ते २०२६ या कालावधीतील बँकेचे संचालक मंडळ चव्हाण यांच्या नेतृत्वाखालचे होते, तरी वसंतराव चव्हाण व भास्करराव खतगावकर यांच्या अध्यक्षीय कार्यकाळातील वार्षिक सभांना अनुपस्थित राहून रजा पाठविण्याचा परिपाठ चव्हाण यांनी जारी ठेवला होता; पण आता बँकेमध्ये भाजपाची सत्ता आल्यानंतर चव्हाण यांनी आपले ‘रजापर्व’ थांबविण्याचे ठरवले आहे. त्यामध्ये भाजपाच्या कार्यशैलीशी अधिक एकरुप होण्याचा भाग असल्याचे मानले जात आहे.
काँग्रेस पक्षामध्ये असताना चव्हाण यांनी अनेकदा पक्ष कार्यालय किंवा अन्यत्र होणार्या छोट्या कार्यक्रमांना जाण्याचे किंवा उपस्थित राहण्याचे टाळले होते; पण भाजपामध्ये आल्यानंतर विशेषतः त्यांची कन्या या पक्षाची आमदार झाल्यानंतर पक्षाच्या स्थानिक बैठका किंवा छोट्या कार्यक्रमांमध्येही खा.चव्हाण आवर्जून सहभागी होत असल्याचे दिसून आले. पक्षाच्या स्थानिक कार्यकर्त्यांना फेसबुकच्या माध्यमातून वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्याची ‘दक्ष’ताही ते घेत आहेत. त्यांच्या कार्यशैलीतील हा लक्षणीय बदल लक्षात घेता जिल्हा बँकेच्या येत्या सोमवारी शंकरराव चव्हाण प्रेक्षागृहात होणार्या सभेस ते उपस्थित राहणार असल्याचे संबंधितांकडून सांगण्यात आले.
