नांदेड : ‘मी खा.अशोक चव्हाण यांच्यासोबत भाजपात गेलो असतो, तर आज आमदार राहिलो असतो,’ असे नुकतेच विधान करणारे काँग्रेसचे माजी आमदार माधवराव जवळगावकर यांनी मंगळवारी पार्डी (ता.अर्धापूर) येथे खा. चव्हाण यांची भेट घेतली. या भेटीप्रसंगी शिवसेनेचे आमदार बाबुराव कदम कोहळीकरही उपस्थित होते. नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीच्या संदर्भाने त्यांच्यात बंद दाराआड चर्चा झाल्याची माहिती मिळाली आहे. किशोर स्वामी यांच्या फार्म हाऊस (शेत निवासा)वर झालेल्या या बैठकीत अर्धापूर व हिमायतनगर तालुक्यातील बँकेच्या मतदारांशी खा.चव्हाण यांनी संवाद साधला.
नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आयोजित या बैठकीत खा.अशोक चव्हाण यांनी अर्धापूर तालुक्यातील राजकीय परिस्थितीचा आढावा घेत बँकेच्या मतदारांशी चर्चा केली. विशेषतः अर्धापूर तालुका सेवा सहकारी सोसायटी व अन्य शेती संस्था मतदारसंघातून उमेदवार कोण असणार, याबाबत प्रमुख पदाधिकाऱ्यांमध्ये विचारविनिमय झाल्याची माहिती मिळाली. अर्धापूर तालुक्यातून ज्येष्ठ असलेले बी.आर.कदम यांची दावेदारी प्रबळ मानली जात आहे. त्यांचे नाव जवळपास निश्चित असल्याचे संकेत वरील बैठकीतून मिळाले. कदम यांच्याखेरीज डॉ. लक्ष्मण इंगोले, व्यंकट कल्याणकर, शिवसेनेचे दत्ता पाटील पांगरीकर यांनीही उमेदवारी अर्ज दाखल केले असले, तरी त्यांना माघार घ्यावी लागणार आहे.
जवळगावकर यांनी नांदेड येथे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या नेतृत्वात पार पडलेल्या काँग्रेसच्या आसूड मोर्चालाही दांडी मारली होती. या पार्श्वभूमीवर जवळगावकर आणि खा.अशोक चव्हाण यांच्यात झालेली बंद दाराआड चर्चा राजकीयदृष्ट्या महत्वपूर्ण असणार आहे. जवळगावकर यांनी हिमायतनगर तालुका सेवा सहकारी सोसायटी व अन्य शेती संस्था मतदारसंघातून जिल्हा बँकेसाठी नामनिर्देशन दाखल केले आहे. यावेळी जवळगावकर यांना बँकेवर बिनविरोध निवडून कसे आणता येईल, यावर चर्चा झाली असल्याची माहिती मिळाली.
वरील राजकीय घडामोडींमुळे काँग्रेसच्या चिंतेत मात्र भर पडली आहे. या भेटीला केवळ निवडणुकीच्या राजकारणापुरते महत्त्व नसून, भविष्यातील राजकीय मांडणीवर आ.कोहळीकर यांच्या उपस्थितीतच सविस्तर चर्चा झाली. कोहळीकर बुधवारी मुंबईमध्ये पोहोचले. जवळगावकर आणि आमचे आता जमले, अशा शब्दांत त्यांनी पुढील घडामोडींवर भाष्य केले.
वरील बैठकीला हिमायतनगर तालुक्यातील जवळगावकर यांचे महत्वपूर्ण कार्यकर्ते आणि बँकेचे मतदारही उपस्थित होते. तसेच हिमायतनगरचे नगराध्यक्ष रफीक शेख, काँग्रेस तालुकाध्यक्ष गजानन सूर्यवंशी यांचीही तेथे उपस्थिती होती. बैठकीला भाजपा जिल्हाध्यक्ष किशोर देशमुख, गणपतराव तिडके, बी.आर.कदम, डॉ.लक्ष्मण इंगोले, व्यंकटराव कल्याणकर, किशोर स्वामी, दत्ता पाटील पांगरीकर यांच्यासह अनेक प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते, तरी महत्त्वाची चर्चा किशोर देशमुख व इतर प्रमुखांना बाहेर थांबवून करण्यात आली, असे येथे समजले.
