नांदेड: नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीच्या निमित्ताने झालेल्या सर्वपक्षीय समन्वयातून निम्म्या जागा बिनविरोध निघाल्यानंतर भाजपातील अंतर्गत बेबनावातून काँग्रेसचे माजी जि.प.अध्यक्ष तथा ‘माघारवीर’ दिलीप पाटील बेटमोगरेकर यांचा भाजपा प्रवेश मात्र गुरुवारी बारगळला. राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते भास्करराव खतगावकर हे या प्रसंगाचे साक्षीदार ठरले.

बेटमोगरेकर यांना पक्षामध्ये दाखल करून घेण्यास भाजपातर्फे सलग तीनदा निवडून आलेले मुखेडचे आमदार डॉ.तुषार गोविंद राठोड यांनी स्पष्टपणे विरोध केला. मुखेडच्या राजकारणातील दोन्ही ‘राजबंधू’ आमचे विरोधक किंवा प्रतिस्पर्धी म्हणूनच आम्हाला सोयीचे वाटतात, अशी खोचक प्रतिक्रिया राठोड यांनी शुक्रवारी व्यक्त केली.

जिल्हा बँक निवडणुकीतल्या समन्वयामध्ये भाजपा नेते खा.अशोक चव्हाण यांनी आमदार तुषार राठोड यांच्यासह बेटमोगरेकर परिवारातील सुशीलाबाई पाटील यांना वेगवेगळ्या मतदारसंघांतून बिनविरोध निवडून आणण्याची दक्षता घेतली. दिलीप बेटमोगरेकर यांनी बिगरशेती संस्था मतदारसंघात काँग्रेस नेत्यांना न विचारता स्वतंत्रपणे अर्ज भरला होता; पण गुरुवारी दुपारी खा.चव्हाण यांच्याशी चर्चा झाल्यानंतर त्यांनी निर्धारपूर्वक भरलेला आपला अर्ज परत घेतला. तसेच भाजपा प्रवेशाचे उपरणे गळ्यात घालून घेण्याची तयारीही ठेविली होती.

त्यांची वरील तयारी पाहून खा.चव्हाण यांनी पक्षाचे मुखेडचे आमदार या नात्याने डॉ.राठोड यांना स्कायलाईट लॉडर्स हॉटेलमध्ये तातडीने बोलावून घेतले. दिलीपराव आपल्या पक्षामध्ये प्रवेश घेेत आहेत, असे राठोड यांना तेथे सांगितले गेले तरी त्यांनी काही बाबी बेटमोगरेकरांसमक्ष स्पष्ट करून नियोजित पक्ष प्रवेशावर बोळा फिरवल्याची माहिती नंतर बाहेर आली.

आपल्या धाकट्या बंधूंचा भाजपा प्रवेश सोहळा ‘याचि देही याचि डोळा’ बघण्यासाठी ज्येष्ठ बंधू हणमंतराव पाटील त्याच हॉटेलच्या सभागृहामध्ये बसून होते. पण हा पक्ष प्रवेश सोहळा बारगळला आहे, असे नंतर त्यांना सांगून आ.राठोड हॉटेलच्या बाहेर पडले. त्यांच्या या बाणेदारपणाचे भाजपातील त्यांच्या समर्थकांनी नंतर स्वागत केले. तुषार राठोड प्रथमच जिल्हा बँकेवर बिनविरोध निवडून आले आहेत. त्यांच्या विजयाचा मुखेडमध्ये जल्लोष करण्यात आला. या बारगळलेल्या पक्ष प्रवेशावर खा.चव्हाण किंवा त्यांच्या प्रवक्त्यांनी कुठलीही प्रतिक्रिया व्यक्त केली नाही.