नांदेड : नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीसाठी दाखल झालेल्या अर्जांची छाननी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर २३ जागांसाठी १६९ उमेदवारांचे अर्ज वैध ठरले. बँकेचे माजी अध्यक्ष आ.प्रताप पाटील चिखलीकर, माजी संचालक गोविंद शिंदे नागेलीकर यांच्यासह अनेक उमेदवारांचे अर्ज अवैध ठरविण्यात आले. या निवडणुकीत भाजपा आमदार राजेश पवार यांच्यासह काही प्रस्थापितांनी इतर मागासवर्ग प्रवर्गासाठी राखीव असलेल्या मतदारसंघातून अर्ज भरले आहेत.

बँकेच्या वरील निवडणुकीची प्रक्रिया गेल्या महिनाअखेरीस सुरू झाली. निर्धारित मुदतीत २५५ अर्ज दाखल झाले होते. बँकेच्या आठ माजी संचालकांचा दहा वर्षांचा कार्यकाळ पूर्ण झाल्यामुळे ते कायदेशीर बंधनामुळे बाद झाले होते. तरीही आ.चिखलीकर व नागेलीकर यांनी अर्ज दाखल केल्यामुळे छाननी प्रक्रियेत त्यांच्या अर्जावर काय निर्णय घेतला जातो, याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. वैध ठरलेल्या अर्जदारांची यादी गुरुवारी प्रसिद्ध झाल्यानंतर चिखलीकर यांचा लोहा तालुका वि.का.सेवा सहकारी संस्था मतदारसंघातील तसेच नागेलीकर यांचा मुदखेडमधील अर्ज अवैध ठरविण्यात आला. खा.अशोक चव्हाण समर्थक बालाजी पांडागळे यांचा कंधार तालुका सेवा सहकारी संस्था मतदारसंघातला अर्जही अवैध ठरला.

विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था प्रतिनिधी मतदारसंघात १६ तालुक्यांत १६ जागा असून त्याकरिता ७९ उमेदवारांचे तर इतर ७ जागांसाठी ९० जणांचे अर्ज वैध ठरले. या निवडणुकीत जिल्ह्याच्या राजकारणातील सहा दाम्पत्यांचे अर्ज दाखल झाले होते. त्या सर्वांचे अर्ज वैध ठरले. सेवा सहकारी सोसायटी (अ) मतदारसंघातील १६ जागांपैकी केवळ कंधार तालुक्यात फक्त दोन उमेदवार रिंगणात आहेत. त्यामध्ये चिखलीकरांची कन्या प्रणिता देवरे आणि माजी आमदार शंकर धोंडगे यांचे बंधू डॉ.सुनील धोंडगे यांचा समावेश आहे.

भाजपा आमदार राजेश पवार यांनी इतर मागासवर्ग प्रतिनिधी मतदारसंघातून अर्ज भरला. त्यांच्या विरोधात त्यांच्याच चुलत भगिनी व माजी आमदार राम पाटील रातोळीकर यांच्या सहचारिणी मंगलबाई रामराव पाटील यांनी खा.अशोक चव्हाण यांच्या सूचनेनुसार अर्ज भरला असून पुढील टप्प्यात तीन वेगवेगळ्या गटांमध्ये तडजोडी झाल्या, तरी रातोळीकर यांनी बहीण-भावातील लढत होऊ द्या अशी भूमिका घेतली आहे.

सेवा सहकारी संस्था मतदारसंघ उमरी तालुक्यातून मारोतराव कवळे यांनी तर धर्माबाद तालुक्यातून त्यांच्या पत्नी सागरबाई कवळे यांनी अर्ज भरला आहे. तडजोडीमध्ये उमरी आणि धर्माबादची जागा मित्रपक्षांसाठी सोडू नका, असे कवळे यांनी खा.अशोक चव्हाण यांना अगोदरच सांगितले होते. त्यानुसार त्यांनी पुढील व्यूहरचना केली असल्याचे सांगितले जात आहे. माजी संचालक हनमंतराव पाटील व त्यांच्या पत्नी सुशीलाबाई यांनी मुखेड तालुक्यातून दाखल केलेला अर्ज वैध ठरला. बेटमोगरेकरांचे बंधू, माजी जि.प.अध्यक्ष दिलीप पाटील बेटमोगरेकर यांनी बिगरशेती सहकारी संस्था व व्यक्ती सभासद मतदारसंघातून अर्ज भरला. या मतदारसंघात एका जागेसाठी १७ उमेदवार सध्या दिसत आहे.

बँकेच्या माजी संचालकांपैकी बी.आर.कदम, कैलास देशमुख गोरठेकर, विजयसिंह देशमुख, भगवानराव पाटील आलेगावकर, राजेश देशमुख कुंटूरकर, लक्ष्मण ठक्करवाड, राजेंद्र केशवे, गंगाधर राठोड, शिवराम लुटे, दिलीप कंदकुर्ते, सुशांत चव्हाण, खा.रवींद्र चव्हाण, शिवकुमार भोसीकर, व्यंकटराव जाळणे इत्यादींचा समावेश आहे.

महिलांसाठी राखीव असलेल्या दोन जागांसाठी अनेक अर्ज दाखल झाले होते. त्यात २३ अर्ज वैध ठरले. यामध्ये राजकीय नेत्यांच्या सहचारिणींची संख्या लक्षणीय असून त्यात प्रामुख्याने पूनम राजेश पवार, सुशीलाबाई हनमंतराव पाटील, मंगलबाई रातोळीकर, सागरबाई कवळे, संगीता पावडे, जाई देशमुख गोरठेकर, अर्चना दहिफळे, विशाखा मुकेश पाटील यांचा समावेश आहे.