नांदेड : नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीची प्रक्रिया गेल्या महिन्यात पूर्ण झाल्यानंतर नवनिर्वाचित २३ संचालकांची यादी विभागीय सहनिबंधकांनी एका अधिसूचनेद्वारे सोमवारी जारी केली. त्यामुळे आता अध्यक्ष – उपाध्यक्ष निवडीची सभा आयोजित करण्याचा मार्ग खुला झाला आहे.
नांदेड जवळच्या परभणी जिल्हा बँकेमध्ये सोमवारीच अध्यक्ष आणि उपाध्यक्षांची निवड झाली. त्यानंतर आता नांदेड बँकेच्या अध्यक्ष – उपाध्यक्षांच्या निवडीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. लातूर विभागीय सहनिबंधकांनी सहकार अधिनियमातील कलम ७३ अ अ अ (५ अ) अनुसार जारी केलेली अधिसूचना जिल्हा उपनिबंधक कार्यालय तसेच जिल्हा बँकेच्या मुख्यालयात सूचना फलकावर लावण्यात आली.
बँकेच्या नुकत्याच झालेल्या निवडणुकीत शेतकरी विकास पॅनेलच्या २३ पैकी २१ जागा निवडून आल्या. त्यामध्ये भाजपाचे सर्वाधिक म्हणजे १४ संचालक असून काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाशी संबंधित प्रत्येकी तीन जण आहेत. शिवसेनेचे अनिल पाटील बाभळीकर याच पॅनेलमधून तर नागेश पाटील आष्टीकर हे स्वतंत्रपणे निवडून आले. नांदेडच्या संगीता पाटील डक याही स्वतंत्रपणे निवडून आल्या.
विभागीय सहनिबंधकांची अधिसूचना जारी झाल्यानंतर येत्या एक – दोन दिवसातच अध्यक्ष – उपाध्यक्ष निवडीच्या सभेची नोटीस निघेल व त्यात नमूद केलेल्या तारखेस नवनिर्वाचित संचालकांची विशेष सभा होईल, असे सांगण्यात आले. शेतकरी विकास पॅनेलचे नेतृत्व खा. अशोक चव्हाण यांनी केले होते. त्यांना माजी अध्यक्ष भास्करराव खतगावकर, आ. प्रताप पाटील चिखलीकर यांनी आवश्यक तो प्रतिसाद दिला; पण अध्यक्षपदी कोणाची वर्णी लावायची ही बाब खा. अशोक चव्हाण यांच्या हाती आहे. आतापर्यतच्या घडामोडीतून उमरी तालुक्यातील मारोतराव कवळे, भोकर मतदारसंघातील ज्येष्ठ नेते बी.आर.कदम या दोघांची नावे चर्चेमध्ये आहेत. खा. चव्हाण या आठवड्याच्या अखेरीस नांदेडला आल्यानंतर पुढील हालचालींना वेग येईल, असे सांगण्यात आले.
