नांदेड: नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमध्ये पुढील काळात कर्मचार्‍यांची भरती करताना गुणवत्तेला (मेरिट) प्राधान्य द्या, अशा कानपिचक्या नव्या संचालक मंडळात देत जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी या बँकेतील अतिरिक्त जबाबदारीचा गुरुवारी निरोप घेतला.

गेल्या मंगळवारी या बँकेच्या अध्यक्षपदी डॉ.तुषार गोविंदराव राठोड तर उपाध्यक्षपदी डॉ.मीनल पाटील खतगावकर यांची बिनविरोध निवड झाली होती. त्यानंतर मागील अडीच महिने या बँकेचे प्राधिकृत अधिकारी म्हणून अतिरिक्त जबाबदारी सांभाळणार्‍या कर्डिले यांनी नव्या अध्यक्षांकडे पदभार सोपविला. आपल्या कार्यकाळात झालेल्या कामकाजातील महत्त्वाच्या बाबींची माहिती त्यांनी यावेळी दिली. बँकेला आता स्थैर्य प्राप्त झालेले आहे. पुढील काळात बँकेला मोठी झेप घेता येईल, असा विश्वास कर्डिले यांनी व्यक्त केला.

वरील औपचारिक बाबीच्या निमित्ताने गुरुवारी दुपारी नूतन पदाधिकारी तसेच काही संचालक बँकेच्या मुख्यालयामध्ये एकत्र आले होते. अनौपचारिक चर्चेमध्ये पुढील काळातील नोकरभरतीचाही विषय निघाला. मंजूर पदांची भरती करताना गुणवत्तेस प्राधान्य द्या, असा मोलाचा सल्ला कर्डिले यांनी दिला. बँकेमध्ये चांगल्या व गुणवान विद्यार्थ्यांची निवड झाली, तरच कारभाराला चांगली दिशा मिळेल, असे अनेकांचे मत आहे. जिल्हाधिकार्‍यांनीही तसाच आग्रह धरल्याचे दिसून आले, तरी मागील संचालक मंडळातील काही ‘प्रतापी’ सदस्य बँकेवर पुन्हा आल्यामुळे वरील विषयात संशयाचे धुके कायम आहे.

बँकेच्या वतीने जिल्हाधिकार्‍यांचा सत्कार करण्यात आला. या छोटेखानी कार्यक्रमास अध्यक्ष-उपाध्यक्षांशिवाय आ.अमरनाथ राजूरकर, माजी आमदार ओमप्रकाश पोकर्णा, संचालक सर्वश्री शिवराम लुटे, राजेंद्र केशवे, श्रीनिवास चव्हाण, कृष्णा पाटील आष्टीकर, मुख्य कार्यकारी अधिकारी अजय कदम तसेच बँकेतील प्रमुख अधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.