नांदेड : नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे मागील संचालक मंडळ गेल्या एप्रिलमध्ये निष्प्रभावित झाल्यानंतर शासन नियुक्त प्राधिकृत अधिकारी तथा जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी कार्यक्षम प्रशासन तसेच आर्थिक शिस्त ह्या बाबतीत बँकेच्या नव्या कारभार्यांसमोर चांगला आदर्श घालून देतानाच अल्प कारकिर्दीत बँकेसाठी महत्त्वाचे निर्णय घेतले.
जिल्हा बँकेवर नुकतेच नवीन २३ संचालक निवडून आले असून त्यांचा कारभार पुढील आठवड्यापासून सुरू होत आहे. बँकेच्या नवीन अध्यक्ष-उपाध्यक्षांची निवड करण्यासाठी सोमवारी होणार्या बैठकीच्या पार्श्वभूमीवर बँकेत सत्तेवर येणार्या गटाचे नेते खा.अशोक चव्हाण यांचे गुरुवारी येथे आगमन झाल्यानंतर पुढील हालचाली सुरू झाल्या. दुसरीकडे बँक प्रशासनाच्या माध्यमातून कर्डिले यांच्या अल्प कारकिर्दीतील काही ठळक बाबीही समोर आल्या.
जून-जुलै दरम्यान या बँकेत निवडणुकीची धामधूम सुरू असताना कर्डिले यांच्या अध्यक्षतेखाली मासिक बैठका घेण्यात आल्या. त्यात एकंदर ७० ठराव पारित झाले. जिल्हा परिषदेतील कर्मचार्यांच्या वेगवेगळ्या पथसंस्थांकडील थकबाकी १५ कोटींवर गेलेली होती. हा विषय समोर आल्यानंतर कर्डिले यांनी जि.प.च्या मुख्य कार्यकारी अधिकार्यांचे लक्ष वेधून थकीत कर्जाची वसुली सुरू करून दिली.
गेल्या मार्चअखेर नांदेड बँक संचित तोट्यातून पूर्णपणे बाहेर पडली. या बाबीचे श्रेय मागील संचालक मंडळाने घेतले होते. पण पूर्वीच्या मंडळींच्या एकंदर कारभारावर खा.चव्हाण यांची नापसंती आता समोर आली आहे. पुढील पाच वर्षे बँकेचा कारभार अत्यंत पारदर्शीपणे चालला पाहिजे. तसेच बँकेतील नियोजित नोकरभरती गुणवत्तेनुसारच झाली पाहिजे, अशी भूमिका चव्हाण यांनी नवीन अध्यक्षांच्या निवडीपूर्वी मांडल्यानंतर अध्यक्षपदाच्या जबाबदारीसाठी ते कोणाची निवड करतात, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
जिल्ह्यातील सहकार क्षेत्रातल्या दोन साखर कारखान्यांकडे बँकेची मोठी रक्कम गेल्या ३० वर्षांपासून अडकून पडली आहे. या कर्ज वसुलीची न्यायालयीन प्रक्रिया जारी असल्याचे सांगितले जाते. गोदावरी मनार कारखान्याकडील थकबाकीच्या वसुलीचा प्रश्नही प्रलंबित आहे; पण कलंबर कारखान्याकडील थकीत १० कोटी रूपये वसूल व्हावेत, यासाठी जिल्हाधिकार्यांनी आपल्या अल्पकाळात काही कायदेशीर बाबी केल्यामुळे वरील रक्कम वसुलीसाठी बँकेच्या प्रशासनाला मोठी मदत झाली आहे.
कारवाईतून चांगला संदेश!
जिल्हा बँकेच्या मुख्य कार्यालयासह ६३ शाखांचा कारभार सुमारे सव्वाशे कायम आणि काही कंत्राटी निवृत्त कर्मचार्यांच्या माध्यमातून चालवला जात आहे. त्यांतील तीन कर्मचारी वेगवेगळ्या प्रकरणांत दोषी आढळून आल्यामुळे त्यांना सेवेतून बडतर्फ करण्यात आले. कासराळी शाखेतील अपहार प्रकरणात दोन कर्मचार्यांवर निलंबन कारवाई झाली. त्यातून बँकेच्या हितास बाधा निर्माण करणार्यांना माफी दिली जाऊ नये, असा संदेशच जिल्हाधिकार्यांनी नव्या कारभार्यांना दिला.
