नांदेड : नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत आमदार प्रताप पाटील चिखलीकर आणि गोविंद शिंदे नागेलीकर यांचे उमेदवारी अर्ज अवैध ठरविण्यात आल्यानंतर त्यांनी व इतर उमेदवारांच्या अपिलांवर गुरुवारी (१० जुलै) दुपारी १२.३० नंतर लातूर येथील विभागीय सहनिबंधक कार्यालयात सुनावणी होणार आहे. या सुनावणीकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

छाननीत आमदार प्रताप पाटील चिखलीकर आणि गोविंद शिंदे नागेलीकर यांचे उमेदवारी अर्ज अवैध ठरविण्यात आले होते. चिखलीकर यांच्या उमेदवारीवर चंद्रसेन पाटील यांनी, तर नागेलीकर यांच्या उमेदवारीवर मारोतराव पाटील व्यवहारे यांनी बँकींग सुधारणा कायद्यातील तरतुदींचा आधार घेत आक्षेप नोंदविला होता. त्यानंतर जिल्हा बँक निवडणूक अधिकाऱ्यांनी सुनावणी घेऊन दोन्ही उमेदवारी अर्ज अवैध ठरविले.

या निर्णयाला आव्हान देत चिखलीकर आणि नागेलीकर यांनी विभागीय सहनिबंधक, लातूर यांच्याकडे अपील दाखल केले आहे. आज या अपिलांवर सुनावणी होणार आहे. याशिवाय बालाजी पांडागळे, मारोतराव पाटील व्यवहारे, देगलूरचे शिवाजी बाळेगावकर यांच्यासह अन्य काही महत्त्वाच्या उमेदवारांच्या अपिलांवरही आज सुनावणी होणार आहे. त्यामुळे जिल्हा बँकेच्या निवडणुकीला निर्णायक वळण देणारा दिवस म्हणून या सुनावणीकडे पाहिले जात आहे.

नोकरभरतीमुळे निवडणुकीचे महत्त्व वाढले!

नव्याने गठीत होणाऱ्या संचालक मंडळाच्या कार्यकाळात जिल्हा बँकेत मोठी नोकरभरती अपेक्षित आहे. मागील कार्यकाळातील भरती प्रक्रिया अनियमिततेच्या तक्रारींमुळे सहकार विभागाने स्थगित केली होती. ती स्थगिती अद्याप कायम असून त्यामुळे यंदाच्या निवडणुकीचे महत्त्व अधिक वाढले आहे.