नांदेड : नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळामध्ये घराणेशाहीची परंपरा आहेच; ती नुकत्याच झालेल्या निवडणुकीतून अधिक समृद्ध आणि व्यापक झाली आहे. त्याचवेळी नेतृत्व करणार्यांनी या बँकेतून दोन मोठ्या समाजांचे प्रतिनिधी हद्दपार केल्याचे दिसून येते.
मागील १० वर्षे या बँकेचे संचालक मंडळ २१ जणांचे होते. यंदापासून बँकेमध्ये २ संचालकांची वाढ झाली. बँकेच्या पूर्वीच्या संचालकांत २ किंवा ३ महिला होत्या. आता प्रथमच महिला संचालकांची संख्या ५ झाली आहे. विशेष म्हणजे बँकेच्या प्रदीर्घ इतिहासात काँग्रेसची मक्तेदार संपवत खा.अशोक चव्हाण यांनी बँकेवर भाजपाचे १४ संचालक आणले आहेत.
नुकत्याच झालेल्या निवडणुकीत खा.चव्हाण यांनी आपल्या प्रभावक्षेत्रातून चार उमेदवार दिले. ते ‘कार्यकर्ता’ या व्याख्येत बसणारे आहेत. इतर पक्षीय नेते किंवा लोकप्रतिनिधींनी बँकेमध्ये घराणेशाहीच्या झेंड्याचा दोरखंड बळकट केला आहे. मागील संचालक मंडळात घराणेशाहीतील प्रतिनिधींची संख्या जेमतेम ५ होती. आता ती १३ झाली असून महायुतीच्या ३ आमदारांनीही बँकेत प्रवेश केला आहे. त्यांच्यातील प्रताप पाटील चिखलीकर हे सर्वात ज्येष्ठ संचालक झाले आहेत.
मागील काळामध्ये या बँकेमध्ये दीर्घकाळ नेतृत्व केलेले श्यामराव कदम यांच्यासह बापूराव पाटील आष्टीकर, बळवंतराव चव्हाण, गोविंदमामा राठोड, बाबासाहेब गोरठेकर, गंगाधरराव कुंटूरकर इत्यादी माजी अध्यक्ष-संचालकांच्या मुलांनी बँकेमध्ये प्रतिनिधित्व केले. या परंपरेचा नव्या संचालक मंडळात मोठा विस्तार झाला असून त्याचा फटका होतकरू कार्यकर्ते किंवा ज्यांनी उत्तम पूर्वतयारी केली होती, त्यांना बसला. शिवराज होटाळकर, श्रावण भिलवंडे, गजानन पांपटवार ही त्यातील ठळक उदाहरणे.
बँकेच्या नव्या संचालक मंडळात मावळते संचालक खा.रवींद्र चव्हाण यांचे काका श्रीनिवासराव चव्हाण तसेच त्यांच्या मामी व माजी संचालक हणमंतराव बेटमोगरेकर यांच्या पत्नी सुशीलाबाई बेटमोगरेकर यांचे झालेले आगमन निवडणूक काळात काँग्रेस पक्षात टीकेचा विषय बनले. श्रीनिवासराव हे नायगावच्या चव्हाण घराण्यातून बँकेवर येणारे चौथे प्रतिनिधी ठरले आहेत.
वरील दोन नव्या संचालकांसह माजी अध्यक्ष भास्करराव खतगावकर यांच्या स्नुषा डॉ.मीनल पाटील, आ.प्रताप पाटील चिखलीकर यांच्या कन्या प्रणिता देवरे, खासदार नागेश आष्टीकर यांचे पुत्र कृष्णा, माजी अध्यक्ष बापूसाहेब गोरठेकर यांचे पुत्र कैलास, माजी संचालिका सविता मुसळे यांचे पती रामचंद्र ऊर्फ चंदर, माजी अध्यक्ष दिनकर दहिफळे यांचे बंधू ज्ञानेश्वर, माजी उपाध्यक्ष नामदेवराव केशवे यांचे पुत्र राजेंद्र, माजी अध्यक्ष गोविंद राठोड यांचे आमदार पुत्र डॉ.तुषार, भाजपाचे दिवंगत नेते संभाजी पवार यांच्या स्नुषा पूनम, उमरी तालुक्यातील जुने नेते गोविंदराव सिंधीकर यांची कन्या संगीता पाटील, माजी आमदार दिवंगत निवृत्तीराव पाटील यांचे पुत्र व माजी आमदार माधवराव पवार इत्यादींच्या रूपात बँकेमध्ये घराणेशाहीची परंपरा अधिक समृद्ध व व्यापक झाली असल्याचे बघायला मिळते.
१९९२ ते २०२६ या कालावधीतील संचालक मंडळामध्ये लिंगायत समाजाकडून हरिहरराव भोसीकर तर आर्यवैश्य समाजातून मोहन पाटील टाकळीकर यांनी बँकेवर सतत प्रतिनिधित्व केले होते. त्यांच्या वारसांनी यंदाच्या निवडणुकीतून बँकेमध्ये पदार्पण करण्याचा प्रयत्न केला; पण नेतृत्वाने तसेच निवडणुकीची सारी सूत्रे हलविणार्या एका दुकलीने त्यांना शेवटपर्यंत झुलवत ठेवले आणि निर्णायक क्षणी या दोन्ही समाजांना डावलण्याचा ‘प्रताप’ खा.अशोक चव्हाण यांच्या एका निकटवर्तीयाने केला. त्यामुळे भोसीकरांचे पुत्र शिवकुमार यांची संचालकपदाची कारकीर्द अल्पजीवी ठरली.
