नांदेड : नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या नव्या संचालक मंडळाची निवडणूक घेण्याची प्रक्रिया गतिमान झाली असून बँकेची प्रारुप मतदार यादी सोमवारी प्रकाशित करण्यात आली. जिल्ह्यातील प्रमुख नेत्यांचा मतदार यादीत समावेश आहे. या बँकेवर आपला वरचष्मा राखण्यासाठी भाजपा खा.अशोक चव्हाण यांचे सूक्ष्म नियोजन सुरू झाले आहे.

वरील बँकेत ५ वर्षे कारभार करणारे संचालक मंडळ गेल्या आठवड्यात निष्प्रभावित झाल्यानंतर प्राधिकृत अधिकारी म्हणून जिल्हा उप निबंधकांनी पदभार स्वीकारला. त्यानंतर गेल्या आठवड्यात विभागीय सह निबंधकांकडे प्रारुप मतदारयादी पाठविण्यात आली. त्यांनी त्यावर पुढील प्रक्रिया पूर्ण करून मतदार यादी अंतिम करण्याचा कार्यक्रम जाहीर केला आहे.
त्यानुसार प्रारुप मतदार यादी सोमवारी जिल्हा उप निबंधक कार्यालय तसेच बँकेच्या मुख्यालयात प्रसिद्ध करण्यात आली. या यादीवर दावे व हरकती नोंदविण्यासाठी १३ मेपर्यंत मुदत देण्यात आली आहे. या मुदतीत दाखल झालेल्या हरकतींवर विभागीय सह निबंधक २५ मेपर्यंत निर्णय देणार आहेत. ही प्रक्रिया झाल्यानंतर २९ मे रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध केली जाईल, असे जिल्हा सहकारी निवडणूक अधिकारी तथा विभागीय सह निबंधक प्रवीण फडणीस यांनी जाहीर केले आहे. प्रारुप मतदार यादीनुसार बँकेच्या ‘अ,ब,क’ या मतदारसंघांमध्ये १२८५ मतदार आहेत.

भाजपा नेते अशोक चव्हाण व काँग्रेसचे रवींद्र चव्हाण या खासदारद्वयांसह जिल्ह्यातील आजी-माजी आमदार तसेच जिल्हा व तालुका पातळीवरील प्रमुख नेत्यांचा मतदार यादीमध्ये समावेश आहे. बँकेच्या पूर्वीच्या संचालक मंडळातील आठ जणांना बँकिंग कायद्यातील नव्या दुरुस्तीमुळे आगामी निवडणूक लढविता येणार नाही. पण त्यांतील बहुसंख्य माजी संचालकांची नावे मतदार यादीत आहेत.

आ.प्रताप पाटील चिखलीकर व त्यांचे पुत्र प्रवीण यांना आगामी निवडणूक लढता येणार नसल्यामुळे चिखलीकर यांच्या कन्या प्रणिता पंकज देवरे यांचे नाव लोहा आणि कंधार या दोन्ही तालुक्यांतील विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थांमधून मतदार यादीमध्ये आले आहे. खतगावकर यांच्या स्नुषा डॉ.मीनल पाटील यांचे नाव बिलोली तालुक्यातून आले आहे. दोन्ही खासदारद्वयांचे नाव दोन वेगवेगळ्या मतदारसंघांमध्ये असल्याचे दिसून आले.

बँकेची पुढील निवडणूक संचालकांच्या २३ जागांसाठी होईल. त्यांतील १६ संचालक १६ तालुक्यांतील विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थांचे प्रतिनिधी म्हणून निवडून येतील. महिलांसाठी दोन जागा राखीव आहेत. त्याशिवाय इतर पाच संचालक बँकेवर निवडून येतील. बँकेच्या ब आणि क मतदारसंघांच्या यादीमध्येही अनेक दिग्गजांची नावे आहेत. या मतदारसंघांमधून निवडणूक लढविण्यासाठी अनेकजण इच्छूक असून खा.अशोक चव्हाण यांच्या गटात (पॅनेल) समावेश व्हावा, यासाठी अनेकांचे प्रयत्न सुरू झाले आहेत. मागील आठवड्यातच भाजपात प्रवेश करणार्‍या संगीता पाटील डक यांचे नाव अ मतदारसंघातल्या नांदेड तालुक्याच्या मतदार यादीमध्ये आहे.

२०२१ साली बँकेच्या निवडणुकीत खा.अशोक चव्हाण यांच्या गटाला भाजपाचे तत्कालीन खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी आपला गट उभा करून आव्हान दिले होते; पण निवडणुकीत चिखलीकर गटाचा ‘दारुण’ पराभव झाला. आगामी निवडणुकीसाठी खा.चव्हाण यांच्यासोबत चिखलीकर गटानेही चाचपणी सुरू केली आहे.

अमर राजूरकर मतदारयादीत!

खा.अशोक चव्हाण यांचे निकटवर्तीय व महानगर भाजपाचे अध्यक्ष अमरनाथ अनंतराव राजूरकर यांचे नाव आजपर्यंत नांदेड जिल्हा बँकेशी कधी जोडले गेले नव्हते; पण प्रारुप मतदार यादीत त्यांचेही नाव झळकले आहे. ‘क’ मतदारसंघाच्या यादीमध्ये श्रीगणेश हातमाग-विणकर सहकारी संस्थेने आपला प्रतिनिधी म्हणून राजूरकर यांच्या नावाचा ठराव पाठवला होता. त्यानुसार त्यांचे नाव समाविष्ट झाले आहे.