नांदेड: नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या प्रारूप मतदार यादीवर नोंदविण्यात आलेल्या आक्षेपांवरील निर्णय जाहीर करण्यास विभागीय सह निबंधक कार्यालयाने दोन दिवस विलंब केल्याचे समोर आले आहे. तब्बल दहा दिवस चाललेल्या प्रक्रियेमध्ये आक्षेपानंतरही अनेक दिग्गजांची नावे यादीमध्ये कायम राहिली आहेत. आ.राजेश पवार यांच्यासह उमरी तालुक्यातील मारोतराव कवळे ही त्यातील ठळक उदाहरणे.
बँकेच्या प्रारूप मतदार यादीमध्ये अनेक संस्थांच्या प्रतिनिधींची नावे वगळण्यात आली होती. त्यांत प्रामुख्याने आमदार भीमराव केराम, भाजपा जिल्हाध्यक्ष अॅड.किशोर देशमुख, राष्ट्रवादीचे शिवराज पाटील होटाळकर यांचा समावेश होता. त्याविरूद्ध त्यांना दाद मागावी लागली. तसेच यादीतील काही दिग्गजांच्या नावांना आक्षेप नोंदवत त्यांची नावे वगळण्यासाठी कायदेशीर लढाई झाली होती.
प्रारूप मतदार यादीची प्रसिद्धी, त्यावर आक्षेप नोंदविण्यास पुरेसा अवधी देणे, दाखल झालेल्या आक्षेपांवर सुनावणी ठेवून निर्णय देणे इत्यादी बाबींची जबाबदारी विभागीय सह निबंधकांकडे होती. त्याचा कार्यक्रम त्यांनीच जाहीर केला होता. त्यानुसार आक्षेपांवरील निर्णय २५ रोजी देणे बंधनकारक होते; पण सर्व प्रकरणांचा निर्णय २७ मे रोजी देण्यात आला.
ज्या अर्जदारांना निर्णयाची प्रमाणित प्रत प्राप्त करायची आहे. त्यांनी नांदेडच्या जिल्हा उप निबंधक (सहकारी संस्था) कार्यालयात यावे व आपल्या प्रकरणातील निकालाची प्रत घ्यावी, असा निरोप संबंधितांना बुधवारी सकाळी देण्यात आला. दोन दिवस विलंब झाल्यामुळे उच्च न्यायालयात जाऊ इच्छिणार्यांची गैरसोय झाल्याचे सांगण्यात आले. या माहितीला बँक प्रशासनासह अनेक आक्षेपकर्त्यांनी दुजोरा दिला.
विभागीय सह निबंधकांनी अंतिम मतदार यादी २९ मे (शुक्रवार) रोजी प्रसिद्ध होईल, असे पूर्वीच जाहीर केले होते; पण यादी प्रसिद्धीची मुदत अद्याप वाढविण्यात आलेली नाही. दोन दिवसांच्या विलंबामुळे मोठा पेच उद्भवल्याचे शिवराज होटाळकर यांचे म्हणणे आहे.
विभागीय सह निबंधक प्रवीण फडणीस ३० मे रोजी निवृत्त होत आहेत. तत्पूर्वी त्यांनी दिलेल्या काही निर्णयांमध्ये ज्यांना उच्च न्यायालयात दाद मागायची आहे, त्यांनी वरील विलंबाबद्दल नाराजी व्यक्त केली. दरम्यान उमरी तालुक्यातील सिंधी सेवा सहकारी सोसायटीचे प्रतिनिधी म्हणून मतदार यादीत आलेल्या मारोतराव कवळे यांच्या नावाला घेण्यात आलेला आक्षेप फेटाळण्यात आल्यानंतर विरोधी गटाने उच्च न्यायालयाच्या संभाजीनगर खंडपीठात धाव घेतली असल्याचे सांगण्यात आले.
नायगावचे आमदार राजेश पवार यांचे नाव आलुवडगाव सेवा सहकारी सोसायटी मार्फत आले होते. त्यांचे नाव वगळण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली होती; पण ती फेटाळून लावण्यात आल्यामुळे पवार यांचे नाव यादीमध्ये कायम राहिले आहे. असाच दिलासा आ.चिखलीकर यांच्या कन्या प्रणिता देवरे-चिखलीकर यांनाही मिळाला असून कंधार व लोहा तालुक्यातून आलेले त्यांचे नाव यादीमध्ये कायम राहिले आहे.
नायगाव तालुक्यातील श्रावण पाटील भिलवंडे यांच्या मतदार यादीतील नावास भास्कर व रवींद्र भिलवंडे यांनी आक्षेप घेतला होता, तो फेटाळण्यात आला आहे. कुंडलवाडी सेवा सहकारी सोसायटीकडून दोन वेगवेगळे ठरावांद्वारे वेगवेगळ्या नावांची शिफारस झाली होती; परंतु या संस्थेच्या वार्षिक सभेने केलेला विठ्ठल कुडमुलवार यांच्या नावाचा ठराव मान्य करण्यात आला.
प्रारूप मतदार यादीवर तब्बल १२९ आक्षेप घेण्यात आले होते. त्यातील वगळलेल्या नावांच्या बाबतीत बहुसंख्य प्रकरणात संंबंधितांना दिलासा मिळाल्यामुळे अंतिम मतदार यादीत आणखी मतदारांची भर पडणार आहे. अंतिम मतदार यादी प्रसिद्ध झाल्यानंतर बँकेच्या निवडणुकीच्या संदर्भाने चित्र स्पष्ट होईल, असे सांगण्यात आले.
