नांदेड : हिंगोली जिल्हा न्यायालयापाठोपाठ आता नांदेड जिल्हा न्यायालयही बॉम्बने उडवून देण्याची धमकी मिळाल्याने खळबळ उडाली आहे. सोमवारी (दि. २) दुपारी पावणेतीनच्या सुमारास ई-मेलद्वारे ही धमकी प्राप्त होताच पोलीस प्रशासनाची एकच त्रेधातिरपीट उडाली. सुरक्षेचा उपाय म्हणून पोलिसांनी तात्काळ जिल्हा दिवाणी व फौजदारी न्यायालय परिसर रिकामा करण्याचे आदेश दिले आणि संपूर्ण परिसरात ‘हाय अलर्ट’ घोषित करण्यात आला.

सोमवारी नांदेड आणि हिंगोलीसह राज्यातील अनेक न्यायालयांना ई-मेल द्वारे बॉम्बने उडवून देण्याच्या धमक्यांचे संदेश प्राप्त झाले. या गंभीर प्रकारची माहिती मिळताच नांदेड पोलिसांनी तातडीने पावले उचलली. सतर्कतेचा उपाय म्हणून बॉम्ब शोध व नाशक पथक , श्वान पथक , जलद कृती दल आणि अतिरिक्त पोलीस फौज फाटा न्यायालयाच्या परिसरात दाखल झाला.

पोलिसांनी संपूर्ण न्यायालयाची कसून तपासणी करत परिसरात कोणतीही संशयास्पद वस्तू किंवा व्यक्ती आहे का, याची खातरजमा केली. दरम्यान, धमकीची माहिती समजताच न्यायालयातील जिल्हा न्यायाधीश, इतर माननीय न्यायाधीश, वकील (अभिवक्ता), न्यायालयीन कर्मचारी तसेच दैनंदिन कामा निमित्त आलेले नागरिक तातडीने न्यायालयाबाहेर पडले. या कारवाईदरम्यान उपविभागीय पोलीस अधिकारी राजेंद्र वैंजने, पोलीस निरीक्षक अजित कुंभार यांच्यासह मोठ्या प्रमाणावर पोलीस फौजफाटा न्यायालय परिसरात तैनात होता.

नागरिकांना अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन

ही एक खळबळजनक अफवा किंवा दहशत निर्माण करण्याचा प्रकार असण्याची शक्यता असून, पोलीस प्रशासनाकडून संपूर्ण परिस्थितीवर बारीक लक्ष ठेवण्यात आले आहे. नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये आणि शांतता राखावी, असे आवाहन करण्यात पोलिसांकडून करण्यात आले आहे.